

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या दक्षिणा पेटीतील रकमेची मोजदाद सुरू असताना लेखा शाखेतील शिपायाने हातचलाखीने दीड लाख रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
बाळासाहेब नारायण गोंदकर (रा.शिर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या शिपायाचे नाव आहे. एक-दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा त्याने बेमालूमपणे ही चोरी केल्याचे समोर आले. साईसमाधी मंदिर व मंदिर परिसरातील दक्षिणा पेट्यांतील दानांची मोजणी आठवड्यातून दोनदा केली जाते. लेखा विभागातील अधिकारी तसेच कायम व कंत्राटी कर्मचार्यांकडून ही मोजदाद करण्यात येते. 16 एप्रिल रोजी दक्षिणा पेटीतील दानाची मोजणी सुरू होती. मोजणी पूर्ण झाल्यानंतर बँक अधिकार्यांना हिशेबाचे कामकाज सुरू असताना भिंतीजवळच्या नोटा मोजणी मशिनमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे बंडल सुरक्षारक्षक विकास संतोष ओहोळ यांना दिसले. नजरचुकीने राहिले असेल असे प्रथमदर्शनी वाटल्याने ते बंडल ओहोळ यांनी रोखपालाच्या ताब्यात दिले. पुढच्या 25 एप्रिलच्या मोजणीवेळी पुन्हा तसाच प्रकार समोर आला.
लेखा शाखेतील कर्मचारी बाळासाहेब सोनवणे यांना यूपीएस व नोटा मोजणी मशिनमध्ये पुन्हा 500 रुपयांचे बंडल आढळून आले. ही बाब प्रभारी लेखाधिकार्यांना कळविण्यात आल्यानंतर सलग तीन वेळा झालेल्या प्रकारामुळे त्यांना संशय आला. लेखाधिकार्यांनी दक्षिणा मोजणी कक्षातील सीसीटीव्ही फुटेज मागवून तपासणी केली.
या फुटेजमध्ये बाळासाहेब नारायण गोंदकर हा दक्षिण मोजणी कामकाजावेळी चोरी करण्याच्या उद्देशाने नोटा लपविताना दिसून आला. मांडीखाली व नंतर पोटाजवळ पॅन्टीत लपविलेली रक्कम बाजूला कोपर्यात टाकून दुसर्या दिवशी स्वच्छता किंवा इतर बहाण्याने ती चोरी करत असल्याचे दिसले. मोजणीच्या तीन वेळा सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम गोंदकर याने चोरून नेल्याचे समोर आल्याने संस्थानने पोलिसांत तक्रार देत गुन्हा दाखल केला. प्रभारी लेखाधिकारी अविनाश विनायक कुलकर्णी यांनी फिर्याद दिली.
साईसमाधी मंदिर व परिसरातील दक्षिणा पेट्यांतील दानाची आठवड्यातून दोन वेळा (मंगळवार व शुक्रवार) मोजणी केली जाते. लेखा विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच कायम व कंत्राटी कामगारांमार्फत ही मोजणी केली जाते. मोजणीनंतर बँक अधिकार्यांना हिशेब देत रक्कम त्यांच्या ताब्यात दिली जाते. मोजणी दरम्यान दोन वेळा पाचशेच्या नोटांचे बंडल बाजूला पडलेले दिसले. त्यामुळे संशय बळावला व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यात हा प्रकार समोर आला.
दक्षिणा पेटीतील नोटांच्या विभागणीचे काम करत असताना कोणाला कळणार नाही याची काळजी घेत गोंदकर हा पाचशे रुपयांचे बंडल सुरुवातीला मांडीखाली लपवून ठेवी. त्यानंतर पोटाजवळ पॅन्टीत लपवी. तेथून तो दक्षिणा मोजणी हॉलमधील नोटा व क्वॉईन चाळणीच्या मध्ये किंवा तेथील क्रेटच्या थप्पीत लपवी. मोजणी कक्षाची साफसफाई करण्याच्या निमित्ताने दुसर्या दिवशी प्रवेश करून दडविलेली रक्कम चोरून नेत असे. 4, 8 आणि 11 एप्रिल अशा तीन मोजणीवेळी त्याने अशा प्रकारे चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले.
संस्थानने एप्रिलमधील 4, 8, 10, 11 आणि 12 या तारखांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मुख्य लेखाधिकारी मंगल वराडे, मुख्य रोखपाल विश्वनाथ बजाज, प्रभारी लेखाधिकारी अविनाश अदलिंग यांनी फुटेजची पाहणी केली असता त्यात बाळासाहेब नारायण गोंदकर हा चोरीच्या उद्देशाने नोटा लपवीत असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली.