

A different twist in the case of Sonam Keni ending her life
कळंबोली : पुढारी वृत्तसेवा
राज्यात पिंपरी-चिंचवड येथील सुनेचा छळानंतर सुनेने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण सध्या गाजत असतानाच पनवेल तालुक्यातील पेठाली गावात २४ एप्रिल २०२५ रोजी विवाहीता सोनम अभिषेक केणी ही घरातच घळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आणि तीची मुलगी बेडवर मृत अवस्थेत निष्पन्न झाले होते.
या प्रकरणी मृत सोनम हिचे वडिल ज्ञानेश्वर शाम पाटील यांनी सोनम व तीच्या मुलीची आत्महत्या नसून तीच्या सासरच्यांनी मुलगा होत नाही तसेच माहेरुन पैसे आणत नाही, या कारणाकरिता लग्न झाल्यापासून छळ करुन अखेर खून केला असल्याचा दावा वरुन तळोजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला.
तक्रारीनुसार १ मे २०२५ रोजी मृत सोनम हिचा पती अभिषेक बाळाराम केणी, सासु प्रभावती बाळाराम केणी, नणंदा हर्षला रंजीत पाटील, वैशाली पाटील, अर्चना संतोष घरत आणि रुपाली अभिषेक माळी या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पती अभिषेक केणी व सासु प्रभावती केणी हे दोघे फरार झाले आहेत.
सोनमवर होणारा अत्याचार व त्रास याची परिसिमा गेल्यानंतर अखेरीस तिने आठ पानी सुसाईड नोट लिहून २४ एप्रिल २०२५ रोजी तिच्या पेठाली येथील राहत्या घरी सायंकाळी साडेचार वाजता साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच तिच्या बेडवरच तिची चार वर्षाची असलेली मुलगी देवांशी ही मृत अवस्थेत आढळली.
तिचा मृत्यू गुदमरून झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु बेडरूमच्या भिंतीवर विष खाऊन मरत असल्याचे लिहिलेले आहे. परंतु भिंतीवर लिहिलेले अक्षर सुसाईड नोटमधील अक्षर हे मिळते जुळते नसल्याने ते देखील संशयास्पद वाटत असल्याचे सोनमच्या वडिलांनी सांगितले आहे.