

कर्जत: तालुक्यातील राशीन येथे मागील रविवारी (दि. 13) घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात पार पडलेल्या शांतता समिती बैठकीत अंतिम निर्णयाजवळ जाऊनही दोन्हीही गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तोडगा मात्र निघाला नाही. त्यामुळे तहसीलदारांनी गुरुवारी (दि. 24) तहसील कार्यालयामध्ये सकाळी 11 वा. पुन्हा एकदा शांतता समितीची बैठक घेण्याचा निर्णय घेऊन बैठकीचे कामकाज संपवण्यात आले.
राशीन घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 19) राशीनमधील दोन्हीही गटाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ यांची बैठक घेण्यात आली. (Latest Ahilyanagar News)
या वेळी तहसीलदार गुरू बिराजदार, पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ, गटविकास अधिकारी सूर्यवंशी, राशीन ग्रामपंचायतीचे प्रभारी अधिकारी रूपचंद जगताप, राजेंद्र देशमुख, श्याम कानगुडे, विजय मोडळे, बाबूराजे राजेभोसले, माऊली सायकर, कुंडलिक सायकर, राम कानगुडे, दीपक काळे, डॉ. विलास राऊत, प्रसाद कानगुडे, बाप्पू धोंडे, श्रीकांत सायकर, अतुल राऊत आदी उपस्थित होते.
राशीन येथील क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काही युवकांनी झेंडा लावला होता. त्यानंतर गावामध्ये तणाव निर्माण होऊन घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिस आले व जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला. यानंतर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कर्जत व राशीन गावामध्ये बंद पाळण्यात आला. रास्ता रोको आंदोलनही झाले.
शनिवारी पार पडलेल्या शांतता समिती बैठकीमध्ये दोन्ही गटांनी आपापल्या भूमिका मांडल्या. प्रशासनाने उपस्थित असलेल्या सर्व जणांना एकत्रित येऊन एकमुखी निर्णय घ्या, असे आवाहन केले होते. चर्चेदरम्यान काही आरोप-प्रत्यारोप घडले. थोडासा गोंधळही झाला. निर्णय होत नसल्यामुळे काहीजणांनी बैठकीतून उठून जाण्याचाही प्रयत्न केला.
मात्र, दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांनी वातावरणामधील तणाव वाढणार नाही याची दक्षता घेतली. प्रत्येकाला विचार मांडू द्या, अशी भूमिका उपस्थितांनी घेतल्यामुळे अनेकांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. अंतिम निर्णयाजवळ जाऊनही तोडगा मात्र निघाला नाही. दोन्हीही गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे तहसीलदारांनी बुधवारी (दि. 23) दोन्ही गटांनी राशीन येथेच बसून याबाबत निर्णय करावा आणि गुरुवारी (दि. 24) तहसील कार्यालयामध्ये सकाळी 11 वा. पुन्हा एकदा शांतता समितीची बैठक घेण्याचा निर्णय घेऊन बैठकीचे कामकाज संपवण्यात आले.
प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी बैठक सुरू होताच राशीन गावामध्ये जी घटना झाली आहे त्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व घटकांमधील शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून, सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत या प्रश्नावर सर्व समावेशक तोडगा काढावा, असे आवाहन केले. तहसीलदार गुरू बिराजदार, पोलिस निरीक्षक शिरसाठ यांनीही या वेळी सूचना मांडल्या.