नेवासा: नेवासा शहरातील अनेक भागांतील विविध प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. मोकाट जनावरांमुळे प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या झुंडी ठाण मांडून असल्याने वाहनधारकही त्रस्त झाले आहेत. अनेक प्रमुख भागात यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरांमुळे सातत्याने अपघातही होत आहेत. नगर पंचायत प्रशासनाने मोकाट जनावरे पकडण्याची व दंडाची मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
शहरातील नगरपंचायत चौक, मराठी शाळा, नाथबाबा चौक, बाजारतळ, तसेच बसस्थानक परिसर अशा वेगवेगळ्या भागांमधील रस्त्यांवर तर जणू काही जनावरांचे साम्राज्यच असल्यासारखी परिस्थिती असते. त्यामुळे वाहनचालकांसह पायी चालणार्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. (Latest Ahilyanagar News)
नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे व कारवाईची भीती नसल्याने शहरातील मोकाट जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे मोकाट जनावरांचे मालक मिळून येत नाहीत. शहरातील बाजारतळमध्ये मोठ्या संख्येने मोकाट जनावरे आहेत. भाजीपाला व फळफळावळ विक्रेत्यांनाही मोकाट जनावरांचा मोठा त्रास आहे. थोडेसे दुर्लक्ष झाल्यास शेकडो रुपयांची फळे व भाजीपाला ही जनावरे फस्त करतात. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने मोकाट जनावरे पकडण्याची व दंडाची मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.