

शिर्डी: शिर्डी शहरात अल्पवयीन मुलांकडून शैक्षणिक जीवन सोडून भिक्षा मागणे, हारतुरे विक्री करणे, फुलांची विक्री करणे, फोटो विक्री करणे किंवा विविध प्रकारचा नशा करून भाविकांना त्रास दिला जात असल्याचे अनेकदा पुढे आले. शिर्डी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अशा 12 मुलांची सुटका केली असून, त्यांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
शिर्डीतून संबंधित 12 मुलांंची सुटका करण्यात आली आहे. त्यांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यांना बाल कल्याण समिती पुढे हजर करण्यात आले व बालकल्याण समितीने या बाराही मुलांना संगमनेर व श्रीरामपूर येथील आधार गृहामध्ये रवाना केले आहे. (Latest Ahilyanagar News)
केवळ अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांची रवानगी आधारगृहात करण्याइतपतच ही मोहीम न थांबवता या मुलांना अशा प्रकारे दुर्लक्षित आयुष्य जगण्यास भाग पाडणाऱ्या, त्यांचे शैक्षणिक आयुष्य उध्वस्त करणाऱ्या त्यांच्या पालकांविरुद्धही शिर्डी पोलिस स्टेशन या ठिकाणी बाल न्याय अधिनियम कलम 75 कलम 76 खाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकूण 12 मुलांच्या 12 पालकांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र असून या पालकांना अटकेची कारवाई देखील पोलिसांकडून करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यातील शिर्डी शहराची पार्श्वभूमी बघता अशाच अल्पवयीन मुलांनी विविध गुन्हे केल्याचे देखील निदर्शनास आले आहे. शिर्डी शहरातील भाविकांची सुरक्षितता, भाविकांच्या शिर्डी शहरातील आगमन या ठिकाणचे वास्तव्य व त्यांचे निर्गमन हे सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे.