

नवीन प्रभाग रचना करताना जुन्या वार्डाचा त्रिफळा उडविल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) क्लिनबोल्ड होतात की विजयी चौकार ठोकणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. कल्याण रोडपासून ते सर्जेपुरातील रंगभवनापर्यंत पोहचलेल्या या वार्डात शिंदेंची शिवसेना व राष्ट्रवादी, भाजपकडे असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारीसाठीच स्पर्धा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
प्रभाग रचनेवर हरकती दाखल झाल्याने त्यात काही बदल होतात का? यावरच शिंदेंच्या शिवसेनेची मदार असणार आहे. अन्यथा शिंदे सेनेचे शिलेदार खिंडीत गाठल्याचे चित्र आहे.माजी महापौर रोहिणी संजय शेंडगे, शाम नळकांडे, सतीश शिंदे आणि अनिल बोरूडे असे शिवसेनेचे (एकत्रित) चार नगरसेवक गतवेळी विजयी झाले होते. (Latest Ahilyanagar News)
शिवसेना दुभंगल्यानंतर हे चारही नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. प्रभाग रचना नव्याने करण्यात आल्याने या चौघांच्या जुन्या वार्डाचे त्रिभाजन झाले आहे. काही भाग अनिल शिंदे यांच्या 15 ला तर काही भाग माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सात नंबरला आणि गांधीनगरचा भाग कुमारसिंह वाकळे यांच्या आठ नंबर वार्डाला जोडला गेला आहे. ज्या भागाशी या चारही नगरसेवकांना कधी संपर्क आलेला नाही, असा भाग जोडून नवीन वार्ड निर्माण करण्यात आला आहेे. सुडके मळा, बोरुडे मळा आणि गांधीनगर, शिवाजीनगरचा परिसर या वार्डापासून तोडण्यात आला आहे.
सिध्दार्थनगर, बालिकाश्रम रस्त्यावरील पोलिस वसाहत, सर्जेपुरातील पोलिस मुख्यालय, सर्जेपुरातील रंगभवन, शरण मार्केट हा भाग नव्याने वार्डाला जोडला गेल्याने शिंदेंच्या शिलेदाराची कसरत झाल्याचे दिसून येते.
शिवसेनेकडून माजी महापौर रोहिणी शेंडगे, सचिन शिंदे, शाम नळकांडे या माजी नगरसेवकांसोबतच संदीप दातरंगे यांनी तयारी चालविली आहे. शिवसेनेचे चौघे उमेदवारीचे दावेदार समजले जात असले तरी महायुती झाल्यास राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अरविंद शिंदे, आरीफ शेख आणि ॲड. युवराज शिंदे यांचीही नावे चर्चेत आहेत. महेश लोंढे हे नवीन नाव समोर आले आहे.
लोंढे हे माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळते हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महायुती झाल्यास शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपकडील इच्छुकांची नावे व संख्या पाहिली तर निवडणुकीअगोदर उमेदवारीसाठीच मोठी रस्सीखेच होणार असल्याचे चित्र आहे.
गत पंचवार्षिकला ज्या भागात शिवसेनेच्या नगरसेवकांनी विकास कामे केली तो बहुतांश भाग तुटल्याने हे नगरसेवक खिंडीत गाठल्याचे चित्र आहे. नव्याने जोडलेला भाग पाहता शिवसेनेच्या चौघांना राष्ट्रवादीची पर्यायाने आ. संग्राम जगताप यांची मदत घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांचीही भूमिका महत्त्वाची असून ते लोकसभेचा हिशेब पाहून मगच निर्णय करतील, असे सांगितले जाते. तसे झाले तर या वार्डात राजकीय संघर्ष पराकोटीला पेोहचतो की काय? अशी शक्यता वर्तविली जाते.
भाजपच्या मदतीशिवाय अशक्य?
भाजपचे धनंजय जाधव यांचा जुन्या वार्डाचा सिध्दार्थनगर, खाकीदास बाबा मठ परिसर या प्रभागाला जोडण्यात आला आहे. या भागावर जाधव यांचे वर्चस्व अजूनही आहे. त्यामुळे त्यांची भूमिका या वार्डातील विजयासाठी महत्त्वाची असणार आहे. असे असले तरी जाधव हे स्वत: निर्णय घेतील, अशी शक्यता नाही. डॉ. सुजय विखे पाटील सांगतील, तीच भूमिका धनंजय जाधव यांची असणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिलेदारांना भाजपचीही मदत घ्यावी लागणार हे आता स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी, भाजपचे संमिश्र वर्चस्व
सर्जेपुरातील पोलिस मुख्यालय, रंगभवन, शरण मार्केट हा भाग राष्ट्रवादीचा मानला जातो. याशिवाय बालिकाश्रम रस्त्यावरील पोलिस वसाहत व परिसरातही राष्ट्रवादी, भाजपचे संमिश्र वर्चस्व आहे. शिंदेंच्या शिवसेनेसाठी हा भाग नवखा असल्याने त्यांना आ. जगताप व डॉ. सुजय विखे पाटील यांची मदत घ्यावीच लागेल, असे चित्र आहे. पोलिस मुख्यालय व पोलिस वसाहतीत सुमारे दोन हजार मतदार असल्याचे सांगण्यात येते. हे मतदार निर्णायक भूमिका बजावतील, असे चित्र आहे.