Mula Dam: ‘मुळा’चे दरवाजे बंद; पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच नदीपात्रात पाणी
राहुरी: पाणलोटातील पाऊस थांबल्याने आवक मंदावली असल्याने मुळा धरणातून नदीपात्रात सुरू असलेला विसर्ज पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. आता धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच आणि पाणलोटात पाऊस पडला तरच नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे.
अगोदर धरण पूर्ण क्षमतेने भरले जाईल, त्यानंतर परतीच्या पावसाची बरसात झाली तरच नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. (Latest Ahilyanagar News)
यंदाच्या पावसाळ्यात मुळातून सुमारे 6 हजार दलघफू पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिले. धरणातील आवक 977 क्युसेक असल्याने धरणाचे 11 दरवाजे पूर्णत: बंद करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली.
26 हजार दशलक्ष घनफुट क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा आजमितीला 25 हजार 827 दलघफू इतका आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरून घेण्याच्या दृष्टीने मुळा पाटबंधारेकडून आवकेचे नियोजन केले जात आहे.
डाव्या व उजव्या कालव्याचे आवर्तन काही दिवसांपूर्वीच थांबविण्यात आले. वांबोरी चारीसाठी मुळातून 178 दलघफू पाणी गेले आहे. डावा कालव्यातून 443 तर उजव्या कालव्यातून 3 हजार 433 दलघफू इतके पाणी खर्च झाले. लाभक्षेत्रात पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांची मागणी थांबल्याने दोन्ही कालव्यातून विसर्ग बंद करण्यात आला. पाणलोटात पावसाने उघडीप दिल्याने आवक मंदावली. आवक हजाराच्या आत असल्याने पाटबंधारे विभागाने धरणाचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
धरण पाणलोट क्षेत्रातील कोतूळ, पांजरे, हरिश्चंद्रगड, शिसवत, कुंभशेत, आंबीत, विहीर, सावरचोळ परिसरात पाऊस पूर्णत: थांबला आहे. शनिवारी काही प्रमाणात संततधार कोसळली, पण त्याच आवकेतून धरण पूर्ण क्षमतेने भरून घेतले जाणार आहे. आता परतीचा पाऊस वाढला तरच धरणातून पुन्हा विसर्ग सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाने उघडीप दिल्याने कार्यकारी अभियंता पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाभियंता राजेंद्र पारखे यांनी धरण पूर्ण भरून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
परतीच्या पाऊस अन् सर्तकता
धरणाचे दरवाजे बंद करून नदीपात्रातील पाणी थांबविण्यात आले असले तरी परतीचा पाऊस जोरात कोसळला तर कधीही धरणातून पाणी सोडले जाईल. त्यामुळे नदीलगतच्या शेतकऱ्यांनी काही दिवस सर्तकता बाळगावी. तसेच नदीपात्रात पाळीव प्राणी व विद्युत पंप टाकण्याची घाई करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
आतापर्यंत 36 वेळा भरले धरण
1972 पासून मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पाणी जमा होण्यास प्रारंभ झाला. तेव्हापासून आतापर्यंत 36 वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गत दोन वर्षांपासून मुळा धरण भरत असताना जायकवाडी धरणही पूर्ण क्षमतेने भरते आहे. त्यामुळे समन्यायीचे संकट टळल्याचा दुहेरी आनंद साजरा होत आहे.

