

नव्या प्रभाग रचनेत वार्डाची तोडफोड झाल्यानंतर राजकीय समीकरणेही तितक्याच वेगाने बदलली आहेत. उबाठा सेनेकडील दिग्गज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले असले, तरी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी त्यांची वाढलेली जवळीक पाहता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांची बोटे तोंडात गेल्याशिवाय राहणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.
गत पंचवार्षिक निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले किशोर डागवाले व गणेश कवडे या दिग्गजांचे सूर जुळण्याचे संकेत आहेत. वार्डाचे राजकारण पाहता राष्ट्रवादीकडे सर्वाधिक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. सोनाली अजय चितळे मात्र भाजपच्या उमेदवार असतील असे चित्र आहे. (Latest Ahilyanagar News)
गत पंचवार्षिकला भाजपच्या सोनाली अजय चितळे, शिवसेनेचे (एकत्रित) गणेश कवडे, सुवर्णा गेनाप्पा आणि सुभाष लोंढे विजयी झाले होते. डागवाले-कवडे यांच्यातील फाईट शहरात चर्चेचा विषय ठरला होता. आता किशोर डागवाले भाजपात असले तरी त्यांची आ. संग्राम जगताप यांच्याशी वाढलेली जवळीक पाहता ते ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत आहेत.
गणेश कवडे हे शिवसेनेत असले तरी त्यांचेही आ. जगताप यांच्याशी असलेले सख्य पाहता प्रत्यक्ष उमेदवार ठरविताना धक्कादायक चित्र समोर आलेले असेल, असे दिसते. यासोबतच माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, सुभाष लोंढे यांचीही नावे चर्चेत आहेत. नरेंद्र कुलकर्णी, मयूर बोचुघोळ हे भाजपकडून पुन्हा चाचपणी करत असल्याची चर्चा आहे.
शिवसेना फुटीनंतर अपवाद सोडता नगरमधील बहुतांश विद्यमान नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. स्व. अनिल राठोड यांचे खंदे समर्थक म्हणून गणेश कवडे यांची ओळख होती. त्यामुळेच किशोर डागवाले विरोधात कवडे यांनी उमेदवारी देण्यात आली होती. त्यापूर्वीच्या सार्वत्रिक निवडणुकीत डागवाले यांनी विक्रम राठोड यांचा पराभव केला होता, ही बाब येथे अधोरेखित करावी लागेल.
किशोर डागवाले हे सलग चार वेळा नगरसेवक राहिलेले असताना पाचव्यांदा मात्र त्यांचा घात झाला. चार वेळा नगरसेवक राहिलेले डागवाले यांचा ‘तो’ वार्ड म्हणजे आताचा नवीन 11 नंबर वार्ड झाल्याचे चित्र आहे. पराभवानंतरही डागवाले यांनी वार्डातील विकासकामांचा झपाटा लावला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून ते आ. संग्राम जगताप यांचे समर्थक आहेत. त्यांच्याच माध्यमातून नगरसेवक नसतानाही डागवाले यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली.
प्रभागाची व्याप्ती पाहता नालेगावपासून ते थेट कापड बाजारापर्यंत अन् तेथून पुढे गंजबाजार, सराफ गल्लीपर्यंत विस्तार झाल्याचे दिसून येते. यातील इच्छुक हे नालेगावातील तर एकमेव डागवाले हे मध्यवर्ती भागातील आहेत. डागवाले यांचा संपर्क, विकास कामे अन् आ. जगताप यांच्याशी असलेले सख्य पाहता राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गणेश़ कवडे शिवसेनेत असले तरी गत ‘लोकसभेचा’ लेखाजोखा पाहता त्यांच्या पक्ष चिन्हाबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. अर्थात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिकाही या वार्डातील उमेदवारी निश्चितीवेळी निर्णायक असणार आहे.
टिळक रोड, झारेकर गल्ली, तोफखाना आणि जुनी महापालिका परिसर वगळून नव्याने कापड बाजार, गंजबाजार, नवी पेठ, एमजी रोड, जुना दाने डबरा, झेंटीगेट जोडून या वार्डाची निर्मिती झाली आहे. नव्याऩे जोडलेल्या भागात डागवाले हे चार टर्म नगरसेवक होते. त्यामुळे उमेदवारी निश्चिती करताना त्यांच्या पारड्यात वजन पडेल, असे दिसते.
या वार्डात उमेदवारी देताना महाविकास आघाडीची दमछाक होण्याची चिन्हे आहेत. उबाठा सेना वगळता काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) यांना उमेदवाराची शोधाशोध करताना पळापळ होण्याची चिन्हे आहेत. उबाठा सेनेलाही उमेदवारी देताना ‘चेक’ करून द्यावी लागणार आहे. राठोड यांच्यापासून दुरावलेले कवडे व डागवाले ही नावे पाहता अन् त्यांच्या ‘युती’चे संकेत पाहता उबाठा सेनेला जपून पाऊल टाकावे लागणार हे नक्की...
आ. संग्राम जगताप यांचा अजेंडा अन् महायुती!
झेंडीगेटचा काही भाग या वार्डाला नव्याने जोडण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या भागातून उमेदवार देण्याची शक्यता वर्तविली जाते. मुळातच या भागातही मुस्लिम समाजाचे वास्तव्य आहे. महायुती त्यापेक्षा आ. संग्राम जगताप यांचा अजेंडा पाहता डागवाले-कवडे यांना एकत्र येण्याचे संकेत दिले जाते. त्यावरच या प्रभागातील विजयाची गणिते जुळणार आहेत. अन्यथा दोघांत तिसऱ्याचा लाभ अशी अवस्था होण्याचा धोकाही वर्तविला जातो. वार्डावर_ राष्ट्रवादीचे प्राबल्य असले तरी उमेदवारी देताना डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिकाही निर्णायक असणार आहे. डागवाले भाजपचे असले तरी त्यांना कमळाची उमेदवारी मिळेलच असे नाही. त्यामुळेच ते राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. महापालिकेवरील सत्तेसाठी भाजपलाही राष्ट्रवादीसोबतच ‘तह’ करावा लागेल, असे चित्र या वार्डात तरी दिसते