

नगर: जिल्ह्यातील अहिल्यानगर, राहुरी व पारनेर या तीन तालुक्यांतील 23 गावांतील एकूण 25 हजार 619 हेक्टर क्षेत्र 15 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2031 या कालावधीसाठी जिवंत दारुगोळ्यासहित मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या मालकीच्या 10 हजार 799 हेक्टर शेतजमिनीचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ही घोषणा केली.
युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार व तोफखाना अधिनियम 1938 च्या कलम 9 च्या पोटकलम (1) व (2) नुसार जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील हे क्षेत्र घोषित केले. अहिल्यानगर तालुक्यातील देहेरे, इस्लामपूर, शिंगवे, नांदगाव, सुजलपूर व घाणेगाव या सहा गावांतील 991.27 हेक्टर खासगी क्षेत्र, 150.85 हेक्टर सरकारी क्षेत्र व 113.11 हेक्टर वनक्षेत्र; राहुरी तालुक्यातील बाभुळगाव, जांभुळबन. (Latest Ahilyanagar News)
जांभळी, वरवंडी, बारागाव नांदूर, कुरणवाडी, घोरपडवाडी, चिंचाळे, गडाखवाडी, ताहाराबाद, दरडगाव थडी व वावरथ या 12 गावांतील 4 हजार 130.64 हेक्टर खासगी क्षेत्र, 2 हजार 260.52 हेक्टर सरकारी क्षेत्र व 5 हजार 657.76 हेक्टर वनक्षेत्र; तसेच पारनेर तालुक्यातील वनकुटे, पळशी, वडगाव-सावताळ, गाजदीपर व ढवळपुरी या 5 गावांतील 5 हजार 677.05 हेक्टर खासगी क्षेत्र, 1 हजार 185.74 हेक्टर सरकारी क्षेत्र व 5 हजार 452.75 हेक्टर वनक्षेत्र यांचा समावेश आहे.
ही ठिकाणे विविध दिवसांसाठी व विविध लक्ष्यांसाठी सराव करण्यास निवडण्यात आली आहेत. त्यामुळे सरावातील विविधता साधता येईल व कोणत्याही विशिष्ट गावांचे किंवा गावसमूहाचे सतत स्थलांतर टाळता येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
या गावांमधील सर्व्हे नंबर, गट नंबर व फॉरेस्ट डिपार्टमेंट नंबरची यादी संबंधित तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी जिल्ह्याच्या ahilyanagar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिली आहे.
गावांचे स्थलांतर होणार नाही
विनिर्दिष्ट क्षेत्रातील गावे व धोकादायक क्षेत्रे ही सरावाच्या आवश्यक दिवशीच महसूल अधिकाऱ्यांमार्फत धोकादायक क्षेत्र म्हणून घोषित करून खाली करण्यात येणार आहेत. मात्र, संपूर्ण कालावधीदरम्यान कोणत्याही गावांचे स्थलांतर होणार नाही. ही कार्यवाही भूसंपादन अथवा पुनर्वसनाची नसून, यापूर्वीप्रमाणे केवळ सराव प्रशिक्षणासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून ठेवण्यात आलेली आहेत.
शेतकरी मालकी हक्काचे क्षेत्र
नगर : 991.27
राहुरी : 4130.64
पारनेर : 5677.05