पारनेर: गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शेवगांव, पाथर्डी तालुक्यांत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अतिवृष्टीसम परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, कपाशी, सोयाबीन, उडीद, बाजरी, तसेच भाजीपाला यांसारखी सर्व हंगामी पिके अक्षरशः पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात दोन ते तीन फूट पाणी साचल्याने उभी पिके कुजू लागली आहेत. सततच्या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. (Latest Ahilyanagar News)
धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या शेतीवर तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढे-नाले भरून वाहत असल्याने वाड्या-वस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते वाहून गेले आहेत. शाळकरी मुले, शेतकरी व ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. पिके नष्ट होऊन उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे खासदार लंके यांनी मागणी केली आहे की, सर्व तालुक्यांतील शेतपिकांचे व सार्वजनिक सुविधांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत मिळावी, पूरसदृश व धोकादायक ठिकाणी आवश्यक त्या यंत्रणांची तातडीने मदत पोहचवावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.