

नेवासा: मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याने सर्वत्र जल्लोष केला जात आहे. आता कांदा दराचाही प्रश्न सुटणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या नेवासा तालुक्यातील शेतकर्यांचा कांदा भाव नसल्याने भुसार्यात पडून आहे.
भावच वाढत नसल्याने कांद्याने आता शेतकर्यांचा आर्थिक वांदा केल्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेत असल्याचे दिसत आहे. आणखी किती दिवस कांदा भुसार्यात ठेवावा लागतोय, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. (Latest Ahilyanagar News)
नेवासा तालुका हा राज्यातील कांदा उत्पादनाचा महत्त्वाचा पट्टा मानला जातो. मात्र, सध्याच्या बाजारभावामुळे शेतकर्यांना कांद्याचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. गेल्या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे कांद्याला चांगला भाव मिळेल, या शेतकर्यांच्या अंदाजामुळे त्यांचे आर्थिक नियोजन सुरळीत पार पडले. यंदाही त्याच आशेवर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतले. मात्र, अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
सध्या बाजारात कांद्याची आवक चांगली आहे. दर मात्र, काही वाढताना दिसत नाहीत. खरीप हंगामातील कांदा बाजारात दाखल झाला आहे, तर लवकरच रब्बी कांद्याची काढणी सुरू होईल. येत्या काही दिवसांत आवक वाढल्यास दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकरी किमान आधारभूत किंमतीची मागणी करत आहेत. रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली तर दर आणखी घसरू शकतात. अशावेळी बाजारातील स्थितीचा आढावा घेत योग्य वेळी विक्री केल्यास नुकसान टाळता येईल, असा सल्ला व्यापार्यांकहून दिला जात आहे.
गंगथडी परिसरात ऊस लागवड कमी करून शेतकर्यांनी कांदा क्षेत्र वाढवले होते. मात्र सध्याच्या घडीला सोयाबीन व मका ही पिकेच शेतकर्यांना आधार देऊ शकतात. कांद्याचे भाव पडलेले आहेत. पावसाने मध्यंतरी ताणले होते . कपाशी, सोयाबीन येते नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना मध्यंतरी भीज पावसाने शेतकर्यांना दिलासा दिला आहे.
जिल्ह्याबाहेर पावसाची सरासरी बरी असतांना तालुक्यात यंदा खरिपातील वाट लागल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अधून मधून येणार्या पावसाच्या श्रावण सरींमुळे पिकांना जीवदान मिळत आहे. यावेळी खरिपाचे उत्पन्न निश्चितच घटणार आहे. कांद्याला भाववाढ होण्याच्या आशेवर शेतकरी जगत आहे.
कांद्याला लाँटरी लागते की नाही? कांदा भुसा-यात किती दिवस ठेवावा लागतो याची चिंता शेतकरी व्यक्त करित आहेत. कपाशी व सोयाबीन पिकांवर फवारणी करून शेतकरी दमला आहे. कांद्याने वांदा केल्याने यंदा कांदा शेतकर्यांची नाकीनऊ आणणार असल्याचे चित्र दिसत आहे.
सणवारांच्या दिवसातच शेतकर्यांची गोची!
सध्या सणासुदीचे दिवस चालू आहे. कांद्याला भाव नाही. नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा, गणपती उत्सव, गौरी महालक्ष्मी आदि सणवार आहेत. लेकीबाळीचे येणेजाणे चालु असते .घरातील धनधान्यांना भाव मिळतो, त्यामुळे दोन पैसे शेतकर्यांच्या हातात नेहमी असतात पंरतु कांद्यासारख्या मालाला भावच नसल्याने शेतकर्यांची आर्थिक गोची झालेली आहे. उसनवारी कुठपर्यंत करायची असा प्रश्न पडला आहे., असे गोंडेगावचे शेतकरी विनायक जाधव यांनी सांगितले.