

लोणी: अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आंदोलनात सरकार आणि आंदोलक यांच्यात यशस्वी मध्यस्थी करून मिळवलेल्या यशाबद्दल शिर्डी विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
मागील चार दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष फक्त मुंबईतील आझाद मैदान आणि मंत्री विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्याकडे होते. एकीकडे आझाद मैदानावरील आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच दुसरीकडे मंत्री विखे पाटील यांच्या बंगल्यावर बैठकांची धावपळ वाढताना दिसून आली. (Latest Ahilyanagar News)
मंत्री विखे पाटील यांनी या सर्व संकटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपसमितीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठका आणि त्यामध्ये अभ्यासपूर्ण पद्धतीने जरांगे यांच्या प्रत्येक मागणीला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सरकारसमोरील मोठा पेच सोडविण्यात विखे पाटील यांना मोठे यश आले आहे.
तालुक्याच्या भूमिपुत्राने केलेल्या कर्तबगारीचा आंदोत्सव विविध गावांत ग्रामस्थांनी फटाके फोडून केला. मंत्री विखे पाटील यांचे सर्वांनी अभिनंदन करून मराठा समाजला मिळवून दिलेल्या न्यायाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.यापूर्वी मंत्री विखे पाटील यांनी मराठा संघटनांचे पदाधिकारी, अभ्यासक आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून लोणीत वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या.