

राहुरी: मुळा धरणाच्या लाभक्षेत्रावर पावसाचा लपंडाव सुरू असताना पाणलोट क्षेत्रावर मात्र आषाढ सरी काहीशा प्रमाणात कोसळत आहे. मुळाच्या बॅक वॉटरमध्ये 5 हजार 990 क्यूसेक प्रवाहाने आवक होत असताना धरण साठा निम्मा झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. 26 हजार दलघफू क्षमता असलेल्या मुळा धरणाचा पाणी साठा 13 हजार दलघफू (50 टक्के) इतका झाला आहे.
मुळा धरणाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील व शाखाभियंता राजेंद्र पारखे यांच्याकडून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील लहित खुर्द येथील सरिता मापन केंद्राकडे विशेक्ष लक्ष दिले जात आहे. धरण साठा समाधानकारक असताना धरणाकडे होणारी कमी जास्त आवक पाहता यंदा धरण अपेक्षानुरूप लवकर भरेल असे बोलले जात आहे. (Latest Ahilyanagar News)
जून महिन्यातच मुळा निम्मे होऊन ऐतिहासिक नोंद होण्याची अपेक्षा होती. परंतु लाभक्षेत्रावर दडी मारलेल्या पावसाने पाणलोट क्षेत्रावरही दडी मारली. परिणामी आवक अत्यल्प होती. दरम्यान, दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्र असलेले हरिश्चंद्रगड, पांजरे व कोतूळ हद्दीमध्ये आषाढी सरी कोसळू लागल्याने धरणाकडे काही प्रमाणात आवक वाढली.
2 ते 3 हजार क्यूसेक होणार्या आवकेत वाढ होऊन काल (दि.1 जुलै) रोजी सायंकाळी 6 वाजता आवक 5 हजार 990 क्यूसेक प्रवाहाने होत होती. धरण साठ्यातही वाढ होऊन मुळाचा पाणीसाठा 13 हजार दलघफू झाल्याची नोंद मुळा पाटबंधारे विभागाने जाहिर केली.
यंदाच्या मान्सून हंगामापूर्वी मुळा धरणामध्ये 8 हजार 890 दलघफू इतका समाधानकारक पाणीसाठा होता. मान्सूनपूर्वीच अवकाळी व मान्सून पूर्व पावसाने धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील छोटी मोठी बंधारे तसेच खड्डे भरून काढली होती. त्यामुळे मान्सून प्रारंभीच धरणाकडे आवक सुरू झाली. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रावर पाऊस झाल्याने काही तासासाठी आवकेत मोठी वाढ झाली होती.
21 हजार क्यूसेकने आवक झाल्याने मोठ्या प्रमाणात धरणात पाणी वाढले. परंतू त्यानंतर पावसाने अपेक्षित कृपा न केल्याने अत्यंत तुरळक प्रमाणात नव्याने आवक येत होती. परिणामी संथ गतीने धरणाचा पाणी साठा वाढत होता. जून महिन्यातच धरण निम्मे भरणार अशी अपेक्षा असताना पावसाची अवकृपेने ऐतिहासिक संधी हुकली. 1 जूलै रोजी धरण साठा निम्मा झाला असून आषाढी सरींची कृपा लाभक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रावर व्हावी अशी प्रार्थना पांडूरंग चरणी केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या खरीप पीकांना पावसाची नितांत गरज आहे. राहुरी परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. काही क्षणातच हलक्या सरी पडून ऊन-ढगाचा खेळ सुरूच आहे. राहुरी परिसरात ढगाळ वातावरणामुळे खरीप पीकांना रोगराईचा फटका बसण्याची शक्यता असून मान्सून कृपा व्हावी, अशी अपेक्षा लागलेली आहे.