.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नगर: जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेरसह अकरा नगरपालिका आणि नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवकपदांची संख्या निश्चित करण्यात आली असून, शासनाच्या राजपत्रात शुक्रवारी प्रसिध्द झाली आहे. अकरा पालिकांसाठी 272 तर नगरपंचायतीसाठी 17 असे एकूण 289 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. श्रीरामपूर पालिकेसाठी सर्वाधिक 34 तर सर्वात कमी 20 सदस्य संख्या राहाता व पाथर्डीची आहे.
श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, शिर्डी, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव व जामखेड नगरपालिका आणि नेवासा नगरपंचायत आदी बारा पंचायतींच्या निवडणुका आगामी काळात होणार आहे. त्यासाठी शासनाच्या आदेशानुसार प्रभाग दोन सदस्यीय असणार आहे. त्यानुसार प्रभागरचना कार्यक्रम सुरु आहे. (Latest Ahilyanagar News)
नगरपालिका क्षेत्रातील जनगणनेची उपलब्ध असलेली विचारात घेऊन (अनुसूचित जाती, जमाती आणि नागरिकांचा मागासप्रवर्ग यांच्या लोकसंख्येसह) नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी निवडून येणार्या सदस्यांची संख्या नगरपालिका प्रशासनाने निश्चित केली. या निश्चित सदस्यसंख्येला मान्यता देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नगरपालिकानिहाय प्रस्ताव विभागीय आयुक्त यांना पाठविला होता. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मान्यता दिल्यानंतर सदस्यसंख्या शासनाच्या राजपत्रात शुक्रवारी प्रसिध्द झाली आहे. यामध्ये प्रत्येक पालिकेच्या सदस्यसंख्येत 50 टक्के महिलांसाठी आरक्षण असणार आहे.
राजपत्रानुसार आता श्रीरामपूर पालिकेसाठी 17, कोपरगाव व संगमनेर पालिकेसाठी प्रत्येकी 15, जामखेड, शेवगाव, राहुरी व शिर्डी पालिकांसाठी प्रत्येकी 12, श्रीगोंदा व देवळाली प्रवरा पालिकांसाठी प्रत्येकी 11 तर राहाता व जामखेड नगरपालिकांसाठी प्रत्येकी 10 प्रभाग असणार आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य निवडून जाणार आहेत.
प्रभागरचनेचा कार्यक्रम मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून सुरु आहे. प्रभागनिहाय स्थळ पाहणी झाली असून, गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार झाले असून, 17 जुलैपर्यंत नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दीची जागेवर जाऊन तपासणी होणार आहे. 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान अकरा पालिका व एका नगरपंचायतीची प्रारुप प्रभागरचना प्रसिध्द होणार आहे. त्यावर 1 सप्टेंबरपर्यंत हरकती मागविण्यात येणार आहेत. 26 ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान अंतिम प्रभागरचना प्रसिध्द होणार आहे.