

सोनई: शिंगणापूर तो सिर्फ झांकी है शिर्डी अभी बाकी है, असे सांगत देवस्थान जिवंत राहण्यासाठी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. परिसरातही मुस्लिमांना कामावर न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले
सकल हिंदू समाजाच्या वतीने शिंगणापूर देवस्थान व मुस्लिम समाजाच्या कर्मचार्यांना नोकरीवरून काढून टाकण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते. (Latest Ahilyanagar News)
आमदार जगताप म्हणाले, हा मोर्चा राजकीय नसून येथे धर्म रक्षणासाठी आहे. इथून पुढे सर्वांनी सर्व ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. देवस्थानमधील सध्या वादग्रस्त ठरलेले बनावट अॅपसंदर्भात कारवाई होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आचार्य तुषार भोसले यांनी शनैश्वर देवस्थान हे जगभरातल्या हिंदूंचे व शनिभक्तांचे आराध्य स्थान आहे. येथे अन्यधर्मियांचे लाड सहन करणार नसून हिंदूंच्या ताकदीमुळे आज मुस्लिम कर्मचारी घरी गेले आहेत. महाराष्ट्रातील कुठल्याही देवस्थानमध्ये हिंदू व्यतिरिक्ततांचे केलेले लाड हिंदू खपवून घेणार नाहीत. महाराष्ट्रातील मंदिरांत असा प्रयत्न झाल्यास सकल हिंदू एकत्र येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सागर बेग यांनी शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळाने कामावरून काढलेल्या हिंदू कर्मचार्यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी केली. लोकसभेत वक्क बोर्डच्या समर्थनार्थ मतदान केलेल्या खासदारांवर गाव बंदी घालण्याचे आवाहन केले. मोर्चासाठी आमदार विठ्ठल लंघे, भाजप नेते ऋषिकेश शेटे, सचिन देसरडा, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या सह हजारो हिंदू समाज बांधव उपस्थित होते.
मागील महिन्यात मुस्लिम व्यक्ती चौथरा सुशोभीकरणाचे काम चौथरा करीत असल्याचे निदर्शनास आल्याने भाजपचे ऋषिकेश शेटे यांनी हे काम त्वरित थांबवले होते. या घटनेनंतर देवस्थानमध्ये असलेले मुस्लिम कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्यासाठी काल (दि.14) मोर्चा काढण्यात आला.
शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीत नियमितपणे कामावर नसलेल्या व कामात कामचुकारपणा करणार्या 167 कर्मचार्यांवर कारवाई करीत त्यांना कामावरून काढून टाकले. यात 114 मुस्लिम कर्मचार्यांचाही समावेश होता.
यावेळी शनिशिंगणापूरचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके व सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.