

श्रीगोंदा: कांदाउत्पादक शेतकर्यांनी कांदा वखारीत साठवून ठेवल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. शुक्रवारी (दि. 13) श्रीगोंद्यात चांगल्या कांद्याला 21 रुपये भाव मिळाला.तालुक्यात यावर्षी कांद्याचे उच्चांकी उत्पादन झाले आहे. मार्च महिन्यात कांद्याचे भाव अचानक पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता.
उत्पादन खर्च अन मिळणारा बाजार भाव याचा ताळमेळ जुळत नसल्याने शेतकर्यांनी उपलब्ध कांदा साठवून ठेवला आहे. परिणामी बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून कांद्याचे भाव अठरा ते वीस रुपयांचे आसपास आहेत. (Latest Ahilyanagar News)
पारगाव येथील खासगी बाजार समितीत दोन हजार कांदा गोण्यांची आवक झाली. 7 रुपयांपासून 21 रुपयांपर्यंत कांद्याला भाव मिळाला.श्रीगोंदा येथील कांदा व्यापारी गौरव पोखरणा म्हणाले, शेतकर्यांनी कांदा वखारीत साठवून ठेवल्याने कांद्याची आवक सध्या कमी आहे.
गेल्या आठवडाभरापासून कांद्याचे भाव बर्यापैकी टिकून आहेत. आणखी एक महिनाभर शेतकरी वखारीतील कांदा बाहेर काढणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. मे महिन्यातच जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतकर्यांचे कांदे पावसाने खराब झाले. सलग पाऊस सुरू असल्याने वखारीतील कांदा खराब होऊ लागला आहे. शेतकर्यांनी साठवणूक करुन ठेवलेला कांदा खराब होणार नाही याची अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.