श्रीगोंदा: उख्खलगाव परिसरात रविवारी (दि. 8) दुपारी जोरदार पाऊस झाला. बेद ओढ्याला आलेल्या पुरात भाऊसाहेब कोरेकर (वय 42) हा शेतकरी वाहून गेला. आ. विक्रमसिंह पाचपुते यांनी सोमवारी (दि. 9) भेट देऊन कोरेकर कुटुंबीयांचे सांत्वन करून पिकांचे पंचनामे करून अहवाल पाठवावा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
नगर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमा रेषेवरील उख्खलगावला रविवारी अवघ्या दोन तासांत सुमारे 100 मिलिमीटर पाऊस झाला. पीक व रस्ते पाण्याखाली गेले. पाझर तलाव क्रमांक एकच्या पाझर तलावाचा मातीचा भराव खचला. वाळके मळ्याचा गावाशी संपर्क सुटला आहे. (Latest Ahilyanagar News)
भाऊसाहेब कोरेकर हे ओढ्याच्या पलीकडे असलेल्या शेळ्यांचा जीव वाचविण्यासाठी गेले आणि स्वतःच पुराच्या पाण्यात वाहून गेले. फळबागांचा मोहर गळून गेला आहे. सोमवारी विक्रमसिंह पाचपुते यांनी उख्खलगावला भेट देऊन शेतकर्यांच्या भावना समजावून घेतल्या.
कोरेकर यांच्या कुटुंबाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून चार लाखांची मदत केली जाईल. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत कशी करता येईल, या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. कृषी विभागाने पिकांचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांचा सर्व्हे करावा, असे आ. पाचपुते यांनी स्पष्ट केले.
या वेळी तहसीलदार प्रवीण मुदगल, गटविकास अधिकारी राणी फराटे, कृषी अधिकारी कांती चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय हाके, सुभाष वाळके, प्रा. संजय लाकूडझोडे, सूर्यभान लाकुडझोडे, बापू ढवळे, अनिल ढवळे आदी उपस्थित होते.