

नगर: अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील मातोश्री वृद्धाश्रमात शनिवारी (दि.२६) पहाटे रक्तरंजित हल्ल्याची घटना घडली. हल्ल्यात सुरक्षारक्षक आणि वृद्ध अशा दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
महाकालेश्वर बाबासाहेब हेणे (वय ५४) आणि दत्तात्रेय शंकर हारके (वय ८०) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. गणेश छबू घोडके (वय ६०), बाळासाहेब अंबादास घाडगे (वय ७८), गोरख हरिभाऊ फुंदे (वय ७४), साहेबराव दगडू भवर (वय ५८), लिंबराज दामोदर फिस्के (वय ८०) आणि संतोष भिमराज पिरंगळ (वय ६०) अशी जखमींची नावे आहेत. जखमी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वृद्धाश्रमातीलच राजू घुले (रा. कुंभारी गावठाण, कोपरगाव) याने सुरक्षारक्षकासह इतर वृद्धांवर हल्ला केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहाटेच्या सुमारास राजू घुले याने प्रथम वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळील सुरक्षारक्षकावर हल्ला केला. या हल्ल्यात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. त्यानंतर घुले वृद्धाश्रमाच्या परिसरात गेला आणि दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला केला. त्यातही संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर घुले याने वृद्धाश्रमातील इतर रहिवाशांवर हल्ला केला. या घटनेत सहा जण जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हल्ल्यानंतर काही वृद्धांनी वृद्धाश्रमाच्या समोरील पेट्रोलपंपावर जाऊन पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची सुरुवातीची माहिती मिळताना काही काळ संभ्रमाचे वातावरण होते. वृद्धाश्रमात दरोडा पडल्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. मात्र, वृद्धांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितल्यानंतर आणि वृद्धाश्रमातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर हल्ल्याचे चित्र स्पष्ट झाले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट दिली. वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विक्रम राठोड आणि संचालक छाजेड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. वृद्धाश्रमातील एकाने इतरांवर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात अधिक तपास करत आहेत.
महिलांवर हल्ला नाही!
मातोश्री वृद्धाश्रमात एकूण ३० जण होते. त्यामध्ये १७ पुरुष व १३ महिला होत्या. राजू घुले याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोराने वृद्धाश्रमातील कोणत्याही महिलेवर हल्ला केला नाही.
हल्ल्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात!
हल्ल्यामागे नेमके कारण काय होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, घटनाक्रम आणि संबंधित व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. घटना नेमक्या कोणत्या कारणातून घडली याचा तपास सुरू आहे. अशी माहिती पोलिस उपअधीक्षक शिरीष वमणे यांनी दिली.