

नगर: दमदार पावसाअभावी जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गेल्या दहा दिवसांत १५ गावे आणि ९६ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसल्या आहेत. त्यामुळे १९ टँकरची नव्याने भर पडली आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. आजमितीस १३३ टँकरव्दारे १२५ गावे आणि ६७२ वाड्यांतील अडीच लाख जनतेला पाणीपुरवठा केला जात आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे भूजलपातळी खालावली असून, दिवसेंदिवस टंचाई परिस्थिती तीव्र होत आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी जिल्हाभरातील आठ तालुक्यांतील ११० गावे आणि ५७६ वाड्यांना ११४ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु होता.
गेल्या दहा दिवसांत पाथर्डी तालुक्यातील ९ गावे आणि ४५ वाड्यांत टंचाई परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या गावांसाठी नव्याने ११ टँकर सुरु झाले आहेत.
शेवगाव तालुक्यातही २ गावे आणि ११ वाड्यात पाणीटंचाईच्या झळा बसल्या आहेत. त्यामुळे या तालुक्यात २ टँकर नव्याने सुरु झाले. कर्जत तालुक्यातील ११ गावे आणि २ वाड्यांत, जामखेड तालुक्यात ४ गावे आणि एका वाडीला पाणीटंचाईच्या झळा बसल्या आहेत.
तालुकानिहाय टँकरची संख्या
संगमनेर: ६, नेवासा : २, नगर : १९, पारनेर :४, पाथर्डी :६५, शेवगाव :१७, कर्जत : १३, जामखेड: ७.