

संगमनेर: यंदा पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. संगमनेर तालुक्यात पावसा अभावी सोयाबीन, मका, बाजरी आणि कडधान्यांसह विविध पिके जळून गेली आहेत. या दुष्काळाची भागाची पाहणी गुरुवारी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण संगमनेर तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे गुरुवारी (दि. २४) कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसाअभावी जळालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे.
सोयाबीन, मका, बाजरी, कडधान्ये तसेच इतर पिकांना पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याअभावी करपून गेली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनाने केवळ कागदी अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीची पाहणी करून निर्णय घ्यावा, अशी भूमिका आमदार खताळ यांनी मांडली.
पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, असेही त्यांनी सांगितले. शासनाने केवळ काही गावांपुरता विचार न करता संपूर्ण संगमनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा.
पावसाचे प्रमाण, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण तालुका दुष्काळी जाहीर करावा. तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार खताळ यांनी शेतकऱ्यांसमवेत कृषिमंत्री यांच्याकडे केली.