

कर्जत: कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती कात टाकत असून, बाजार समितीमध्ये 60 टन क्षमता असणारा अत्याधुनिक वजन काटा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेतकर्यांसाठी शेतकरी भवनही बांधण्यात येणार आहे. बाजार समितीची ही आश्वासक व विकासाची वाटचाल विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, अशी माहिती सभापती काकासाहेब तापकीर यांनी दिली.
बाजार समितीच्या कर्जत येथील यार्ड मध्ये अत्याधुनिक संगणकीय 60 क्षमता असणारा इलेक्ट्रिक वजन काटा बसवण्यात येणार असून, याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सभापती प्रा. शिंदे यांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा पुढील महिन्यामध्ये संपन्न होणार आहे. अत्याधुनिक व जास्त क्षमतेचा वजन काटा उभारण्यात आल्यामुळे याचा फायदा शेतकर्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. (Latest Ahilyanagar News)
यापूर्वी शेतकर्यांना त्यांचा शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणताना बाहेरूनच खासगी वजन काट्यावरून वजन करून आणावा लागत होता. यावेळी त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होत होते. याशिवाय व्यापार्यांनाही खरेदी केलेला माल इतरत्र पाठवण्यासाठी खासगी वजन काट्यावर जाऊन वजन करावे लागत होते.
या बाजार समितीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तूर व उडीद यासह इतर सर्वच धान्याची विक्रमी खरेदी व शेतकर्यांना विक्रमी भाव देण्यात आला. आता संस्थेने पुढाकार घेऊन याच ठिकाणी व्यवस्था केल्यामुळे याचा फायदा शेतकरी व व्यापारी यांना मोठ्या प्रमाणामध्ये होईल, असे तापकीर यांनी सांगितले.
सभापती प्रा. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमध्ये मिरजगाव, राशीन व कर्जत या सर्व ठिकाणी विविध विकासकामे सुरू आहे. पुढील काळामध्ये कर्जत येथे एक कोटी 46 लाख रुपये खर्च करून शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे. यामुळे या ठिकाणी येणार्या शेतकर्यांना त्याचा मोठा फायदा होईल, तसेच हमाल भवन बांधण्यासाठीही प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे तापकीर यांनी सांगितले.
कर्जत व राशीन येथे व्यापारी गाळे उभारून व्यापार्यांना व शेतकर्यांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. यासाठी उपसभापती व सर्व संचालक मंडळाचेही मोलाचे योगदान असून, लवकरच अत्याधुनिक वजन काट्याचे लोकार्पण राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात येईल, असे तापकीर शेवटी म्हणाले.