

नगर: उन्हामुळे झालेले पाण्याचे बाष्पीभवन, रब्बी आणि उन्हाळी पिकांबरोबरच बिगरसिंचनासाठी सोडलेले आवर्तन, प्रवरा नदीपात्रात सोडलेले आवर्तन तसेच पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाची दडी यामुळे जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे आदी मोठ्या धरणांसह सर्वच धरणांच्या पाण्याने तळ गाठला आहे. आजमितीस या धरणांत फक्त २४.५४ टक्के म्हणजे १२ हजार ५३८ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ हजार ८६२ दशलक्ष घनफूट (पावणेसहा टीएमसी) इतका पाणीसाठा कमी आहे.
धरणांतील शिल्लक पाणी तसेच कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शासनाने जिल्हाभरातील पाणीसाठा आरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले असून, नद्या, तलाव व इतर जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत व बेकायदेशीर पाणीउपसा करणार्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या पावसाळ्यात जून महिन्यातच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला प्रारंभ झाला होता. ऑगस्टपर्यंत भंडारदरा, मुळा, निळवंडे आदी धरणे जवळपास ओव्हर-फ्लाे झाली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाने जाता जाता हाहाकार उडवून दिला होता. खरीप पिकांची नासाडी करीत असतानाच भूजलपातळी वाढवली होती. जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठी नऊ धरणे ओव्हर-फ्लो असल्याने रब्बी पिकांना हवे तेवढे पाणी उपलब्ध झाले.
बिगर सिंचनासाठी देखील मागणीनुसार आवर्तने सोडण्यात आली. तसेच यंदाच्या उन्हाच्या झळा अधिक तीव्र असल्याने धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन झाले. गेल्या महिन्यात भंडारदरा धरणाचे काही पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा धरणातून सिंचन व बिगरसिंचनासाठी आवर्तन सुरू झाले. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्याने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच तळ गाठला आहे. मुळा धरणात गेल्या वर्षी या कालावधीत ९ हजार २९१ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र ६ हजार ७०७ दशलक्ष घनफूट इतकाच साठा शिल्लक आहे. निळवंडे धरणात २ हजार ५८६ दशलक्ष घनफूट इतका होता. आज मात्र १ हजार ९२३ दशलक्ष घनफूट इतकाच साठा शिल्लक आहे. अशीच परिस्थिती आढळा, सीना, मांडओहळ, खैरी आदी धरणांची आहे.
यंदा ‘एल निनो’चा प्रभाव असल्याने पर्जन्यमानात घट होण्याची शक्यताही भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे धरणे, तलाव आदी ठिकाणी असलेले उपलब्ध पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे निर्देश नुकतेच शासनाने दिले आहेत. अद्याप पावसास प्रारंभ झाला नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे.
पाणीसाठा
भंडारदरा : २३६५ (२१.४२)
निळवंडे : १९८२(२३.८२)
मुळा : ६७६६ (२६)
आढळा : ३७४ (३५)
मांडओहळ : ४८.७६ (१२.२२)
घाटशीळ : ९४ (२१.५१)
सीना : ८१६ (३४)
खैरी : १०५.३५ (१९.७७)
विसापूर : १०३.२८ (११.४१)
गेल्या वर्षी मेमध्ये मुसळधार
गेल्या वर्षी मे महिन्यात जवळपास २२० मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे सीना, विसापूर व इतर काही धरणांत आवक झाली होती. त्यामुळे १४ मे २०२५ रोजी सीना धरण ९९.६८ टक्के, तर विसापूर धरण ७६.९२ टक्के भरलेले होते. मुळा, मांडओहळ धरणांतही अधिकचा पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या वर्षी धरणांत १८ हजार ३०८ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक होता.
पाणलोटातही दडी
गेल्या वर्षी १४ जूनपर्यंत भंडारदरा धरण पाणलोटात रतनवाडी येथे १६५, घाटघर येथे २००, पांजरे येथे ८२, वाकी येथे ८२, तर मुळा धरण पाणलोटात कोतूळ येथे ८० मिलिमीटर पावसाची नोंद होती. त्यामुळे भंडारदरा, मुळा धरणांत आवक सुरू झाली होती. यंदा मात्र, रतनवाडीत फक्त १३, घाटघर ५, पांजरे ८, वाकी ४ तर कोतूळ परिसरात शून्य मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणांत आवक म्हणावी अशी झाली नाही.