

नगर: जिल्ह्यात ‘लम्पी’ने पुन्हा हाहाकार उडवला आहे. राहाता, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, नेवाशासह सात तालुक्यात बाधित जनावरांची संख्या दररोज वाढती आहे. 255 गावांत 1180 जनावरांव्दारे लम्पीने शिरकाव केला आहे.
तर 40 जनावरांचा यात मृत्यू झाल्याने शेतकरी घाबरला आहे. दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केला असून, पशुसंवर्धन विभागासह स्थानिक ग्रामपंचायतींना विशेष सूचना केल्या आहेत. (Latest Ahilyanagar News)
जिल्ह्यात शेतीला दुग्धव्यवसाय हा जोडधंदा आहे. त्यामुळे या ठिकाणी पशुधनांची संख्या अधिक असून, गायांची संख्या सुमारे 15 लाखांवर आहे. त्यामुळे दुग्धव्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असल्याचे दिसले आहे. मात्र लम्पीने या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. काही दिवसांपासून पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
जिल्ह्यात कालअखेर 1180 जनावरांना प्रादुर्भाव झाला असून, त्यापैकी 713 जनावरे उपचारातून बरी झाली आहेत. आतापर्यंत 40 जनावरांचा मृत्यू झाला आहे. सध्या 427 जनावरांवर उपचार सुरू असून, पशुसंवर्धन विभागाने 253 प्रतिबंधित केंद्रे जाहीर केली आहेत. संबंधित गावांच्या परिसरातील पाच किलोमीटर परिसरात दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
आतापर्यंत राहाता तालुक्यात 261, कोपरगावला 107, कर्जतला 101, जामखेडला पाच, अकोल्याला 16, अहिल्यानगरला 5, पारनेरला 30, राहुरीला 85, संगमनेरला 181, शेवगावला 48, श्रीगोंदा येथे 19, नेवाशात 279, कोपरगावला 107, व श्रीरामपूरला 29 जनावरे बाधित झाली. त्यातील 40 जनावरांचा मृत्यू झाला असून, त्यात राहात्याला 18, नेवासा 5, संगमनेर 6, कोपरगाव 5 , श्रीरामपूर 1, राहुरीला 2, शेवगावला 2 जनावरे दगावली आहेत.
लम्पीने 28 वासरांचा मृत्यू
जिल्ह्यात लम्पीने बाधित झालेल्या 1180 जनावरांमध्ये 510 तसेच 40 मृत जनावरांमध्ये 28 वासरांचा समावेश आहे. वासरांचे वय कमी असल्याने त्यांचे लसीकरण करणे शक्य नसल्याने त्यांच्यात लम्पीचा प्रादूर्भाव जास्त दिसून येतो.