

नगर: दर वर्षी ऊसतोडणी सुरू झाली, की उसात असलेला बिबट्या सैरभैर होऊन मानवी वस्तीकडे कूच करत हल्ले करू लागतो. यात पाळीव प्राण्यांसह माणसांनाही जीव गमवावा लागतो. बिबट्या दिसला की पिंजरा लावण्याची मागणी होते, पण अशी तजवीज आधीच केली जात नाही. बिबट्या आणि मानवातील संघर्ष वाढतानाच दिसत आहे. नेवासा तालुक्यात भालगाव येथे एका शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला, तर दुसरीकडे कोपरगाव तालुक्यात पोहेगावनजीक सोनेवाडीच्या नगदवाडी येथील ऊसतोडणी मजुरांच्या अड्ड्यावरच बिबट्याने हल्ला केला. भालगावात मुलगा जखमी झाला, तर ऊसतोडणी मजूर प्रसंगावधानामुळे बचावले...
गोधेगावात शेतमजुराचा बळी घेणाऱ्या बिबट्याने भालगावात शालेय विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. मॉर्निंग वॉक करणारे तरूण वेळीच मदतीला धावल्याने सुदैवाने तो बचावला. मंगळवारी (दि.२७) पहाटे ही घटना घडली. बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले, मात्र त्यात बिबट्या जाईना अन् शेतकरीही शेतात जाईना, असे चित्र गोधेगाव, भालगावात निर्माण झाले आहे. शिवराज मुकेश शिंदे (वय १२) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्यावर अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू आहेत. गोधेगाव येथील सुरेश उर्फ भोऱ्याबाबा अहिरे या शेतमजुराचा १५ ऑक्टोबर बिबट्याने बळी घेतला होता. बिबट्याने लचके तोडलेला अहिरेचा मृतदेह दोन दिवसांनी आढळून आला होता.
बिबट्या नरभक्षक झाल्याची भीती गावकऱ्यांना होती. वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी बिंचरे लावले, मात्र बारा दिवस उलटूनही बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश आलेले नाही. अशाताच आता भालगावात बिबट्याने शालेय विद्यार्थ्यावर हल्ला केला. गोधेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर भालगाव आहे. भालगावातील १५/२० तरुण नियमीतपणे नेवासा रोडला मॉर्निंग वॉकसाठी जातात. बिबट्याच्या भितीने प्रत्येकाच्या हातात काठी असते. शिवराज इतर मुलांपेक्षा ५० फुट अंतरावर पुढे चालला होता. संतोष तनपुरे यांच्या शेताजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवराजच्या अंगावर झडप घातली. जीवाच्या अंकाताने तो ओरडला. त्याची आरोळी ऐकून अन्य मुलं मदतीला धावली. हातातील काठ्या पाहून बिबट्याने उसात धूम ठोकली. सुदैवाने शिवराज बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला. बिबट्याकडून ओरबडल्याने त्याच्या पायाला जखमा झाल्या आहेत. गोधेगाव पाठोपाठ आता भालगाव परिसरातही बिबट्याची धास्ती वाढली आहे.
बिबट्या जेरबंद होईना अन् शेतकरी शेतात जाईना!
गोधेगाव व भालगाव परिसरात बिबट्याच्या धास्तीने शेतकरी शेतातील कामे करण्यास शेतात जात नाही. कामे खोळंबली आहेत. बिबट हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. परिसरात पिंजरे लावले. ड्रोन कॅमेरे असताना बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागाला अपयश येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
उसतोड मजुरांच्या फडावर हल्ला
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील नगदवाडी परिसरात उसतोड मजुरांच्या फडावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. बिबट्या आपल्याकडे येत असल्याचे लक्षात येताच निता आनंद भिल या महिलेने प्रसंगावधान राखत तेथून पळ काढला. त्यामुळे सुदैवाने त्यांचा जीव वाचला. या घटनेमुळे उसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.
कर्मवीर काळे कारखान्याच्या उसतोडीसाठी आलेल्या मजुरांना सोनेवाडी येथील नगदवाडी परिसरात गांगुर्डे यांच्या शेतात राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणाच्या आजूबाजूला शेतीतील पिके असून काही भाग ओसाड माळरानाचा आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फडावर प्रकाशाची व्यवस्था नसल्याने धोका वाढला
उसतोड मजुरांच्या राहण्याच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. परिसरात विद्युत वितरण कंपनीचे खांब असले, तरी तेथे वीज उपलब्ध नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते. अशा परिस्थितीत बिबट्याने थेट मजुरांच्या फडावर हल्ला केल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बिबट्या आपल्याच दिशेने येत असल्याचे निता आनंद भिल यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने तेथून पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दिवसभर उसतोडणी करून थकून भागून आलेल्या मजुरांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला असून रात्रीच्या वेळी फडावर राहणे त्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, कर्मवीर काळे कारखान्याच्या प्रशासनानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन उसतोड मजुरांच्या फडावर पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी. रात्रीच्या वेळी मजुरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे
तातडीने पिंजरा लावा
हल्ल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. संबंधित परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे. तसेच ऊसतोड मजुरांच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
सुरक्षेचा प्रश्न गंभीर
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह उसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे वनविभाग आणि कारखाना प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.