

कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काल अर्ज माघारी झाली. नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवकांच्या 30 जागेसाठी 127 उमेदवार रिंगणात कायम आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांतून मोठी बंडखोरी झाल्याचे दिसले.
दरम्यान, कोपरगावात नगराध्यक्ष पदासाठी ‘अष्टरंगी’ लढत होणार असली तरी मुख्य लढत प्रमुख चार पक्षातच होणार आहे. यातही, पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले काळे विरुद्ध कोल्हे यांच्या गटाभोवतीच ही निवडणूक फिरणार असल्याची चर्चा आहे.
नगराध्यक्षपदासाठी एकूण 9 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी सुहासिनी कोयटे यांनी माघार घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी आठ जणांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आठ जणांमध्ये चुरशीची लढत होईल, असे सांगितले जाते.
प्रामुख्याने भाजपाचे (कोल्हे गट) पराग संधान, अजित पवार राष्ट्रवादी काळे गट ओमप्रकाश तथा काका कोयटे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे राजेंद्र झावरे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सपना भरत मोरे, अपक्ष उमेदवार विजय वहाडणे, दीपक वाजे, योगेश वाणी व रहिमुलीस कुरेशी यांचा समावेश आहे. त्यामुळे या दिग्गज उमेदवारांच्या दावेदारीमुळे कोपरगावकरांना नगराध्यक्षपदी कोण होईल, याची उत्सूकता आहे.
कोपरगाव नगरपालिकेत 30 नगरसेवक पदासाठी आजपर्यंत 25 इच्छुकांनी माघार घेतली आहे. अर्ज माघारीनंतर 127 उमेदवार रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. दि. 26 रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. अद्यापपर्यंत एकही आचारसंहिता भंगाची तक्रार आली नसल्याचे तहसिलदार सावंत यांनी सांगितले. 30 नगरसेवकांपैकी 15 पुरुष तर 15 महिला नगरसेवकांना निवडावयाचे आहे. त्यामुळे 50 टक्के आरक्षण पालिकेत दिसणार आहे.
अपक्ष उमेदवार दीपक वाजे यांच्या माघारीवरून काळे-कोल्हेंमध्ये मोठी ओढातान झाली. एका गटाला या अर्जाचा फायदा होणार असल्याने त्यांच्याकडून वाजे यांना पाठबळ मिळत गेले, तर ज्या गटाला तोटा होणार होता, त्यांच्याकडून शेवटपर्यंत्त मनधरणी सुरू असल्याचे दिसले. नगराध्यक्ष पदासाठी वाजे यांना कोल्हे गटाकडून उमेदवारी मिळावी म्हणून अपेक्षा होती, तसे त्यांनी त्यांच्यापुढे शक्ती प्रदर्शनही केले होते.