

कर्जत: कर्जत नगरपंचायतीकडून शहरातील व्यावसायिकांना अतिक्रमणप्रश्नी बजावण्यात आलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ कर्जतमध्ये बुधवारी (दि. २९) संपूर्ण दिवसभर अत्यावश्यक सेवांसह कडकडीत बंद पाळण्यात आला.
अवघ्या काही दिवसांवर ग्रामदैवत गोदड महाराजांची रथयात्रा आलेली असताना या दिलेल्या नोटिशीमुळे मोठी खळबळ उडाली. सकाळपासूनच सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते. विशेष म्हणजे सर्व अत्यावश्यक सेवांचे व्यावसायिकही यामध्ये सहभागी झाले होते. अशा पद्धतीचा बंद यापूर्वी कर्जतमध्ये कधीच झालेला नव्हता.
सकाळी सर्व व्यापारी बसस्थानक परिसरामध्ये एकत्र आले. त्यानंतर शहरातील व्यापारी पेठेमधून रॅली काढून ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरामध्ये सर्वांनी दर्शन घेतले. त्यानंतर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आल्यानंतर जोरदार घोषणाबाजीत आंदोलन करण्यात आले.
या वेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बिभिषण खोसे, मेन रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश जेवरे, दादासाहेब सोनमाळी, शरद मेहत्रे, अभय बोरा, राहुल नवले, प्रसाद शहा, सुरेश काका खिस्ती, रावसाहेब धांडे, काका लांगोरे, गणेश साखरे, गोकुळ शिंदे आदींनी मनोगतात शहरातील व्यावसायिकांना नगरपंचायतने दिलेल्या नोटिसीबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली.
स्वाती बोंगाणे यांचे जे उपोषण सुरू आहे, ते त्यांच्या खासगी जागेमध्ये जे अतिक्रमण झाल्याबद्दल आहे. तो प्रश्न नगरपंचायतने व सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ सोडवावा, अशी मागणी या वेळी केली.
यानंतर आंदोलनाच्या ठिकाणी मुख्याधिकारी अक्षय जायभाय आल्यानंतर गोंधळ झाला. तणावाची परिस्थिती पाहून व्यापारी संघटनेने निवेदन त्या ठिकाणी न देता आंदोलन स्थगित केले. यानंतर सर्व व्यापाऱ्यांतर्फे नगरपंचायतचे मुख्याधिकारी अक्षय जायभाय, तहसीलदार रवी सत्वन, पोलिस निरीक्षक हनुमान गायकवाड यांना व्यापारी शिष्टमंडळातर्फे निवेदन देऊन तत्काळ नगरपंचायतने दिलेल्या नोटिसी रद्द कराव्यात.
आगामी काळ हा यात्रेचा असल्याने शांतता राहण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, तसेच शहराची वाढती लोकसंख्या व भविष्यामध्ये वाहतुकीचे निर्माण होणारे अनेक प्रश्न यामुळे शहरासाठी रिंग रोड व बायपास करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनामध्ये केली आहे.
प्रशासनाकडून व्यापारी बांधवांना सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी चर्चा करताना व्यापारी शिष्टमंडळाला दिले.