

नगर तालुका : वातावरणात होणारे अवेळी बदल... त्यामुळे पडणारा अवकाळी पाऊस... कांदा पिकासह शेतमालांचे होणारे नुकसान... शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेले पाणी... शासनाकडून होणारे दुर्लक्ष... त्यामुळे शेतकऱ्यांसमोर उभे राहिले अस्मानी संकट. अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव येथे कांद्याचे विक्रमी पीक घेतले जाते. त्याला योग्य भाव सापडला तर शेतकरी आनंदी होतो. पण यंदा कांद्याने शेतकऱ्यांना रडविले आहे. (Latest Ahilyanagar News)
पाच महिन्यांपूर्वी त्यांनी पिकविलेला गावरान कांदा चाळीमध्ये सुरक्षित ठेवला होता. जास्तीचा भाव मिळेल या आशेने वाट पाहिली; पण कांद्याला दहा रुपयांच्या पुढे भाव जाईना. त्यातच अवेळी पडणारा पाऊस व शासनाची उदासीनता त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. त्यांच्या वेदना शासनाला समजत नाही. योग्य भाव मिळत नाही. यामुळे साठवून ठेवलेला कांदा पावसामुळे सडला असून, त्याची दुर्गंधी पसरली आहे. तळहातावरील फोडासारखा जपलेला कांदा रस्त्यावर फेकून देताना त्याच्या डोळ्यांतून अश्रू गळत आहे. ही परिस्थिती गावांमधील सगळ्या शेतकऱ्यांची असून, तेही चिंतेत झाल्याचे दिसत आहे.
अहिल्यानगर- पुणे महामार्गावर गोरख जाधव व पिनू भोसले या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करून कांदा फेकून दिला. त्याची आज तुकाराम कातोरे, पोपटराव ठोकळ, मेजर गोरख जाधव, संतोष गायकवाड, राजाभाऊ पोटे, रमजान शेख, पिनु भोसले यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना आधार दिला. शासन स्तरावर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही व कांदा पिकवण्यासाठी येणारा उत्पादनखर्च परवडत नाही. त्यामुळे त्याला कर्जबाजारी व्हावे लागते. त्यासाठी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी व शाश्वत हमी भाव द्यावा तर आणि तरच हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकेल.
तुकाराम कातोरे, सामाजिक कार्यकर्ते, कामरगाव