

कर्जत : तालुक्यातील पाटेवाडी गावातील बेबी साईनाथ पवार (वय 65) या आदिवासी महिलेचे रविवारी निधन झाले. आयुष्यभर गरिबी, उपेक्षा आणि संघर्ष अनुभवलेल्या या वृद्धेच्या मृत्यूनंतरही तिच्या नातेवाइकांच्या यातना संपल्या नाहीत. दोन दिवस उलटले तरी अंत्यविधीसाठी जागा न मिळाल्याने अखेर सर्व आदिवासी बांधव मृतदेह घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात पोहोचले. (Latest Ahilyanagar News)
तहसील कार्यालयाबाहेर रडवेल्या आक्रोशाने वातावरण भारावून गेले. आम्हाला आमच्या आईला मृत्यूनंतरही यातना का. दोन दिवस झाले आता न्याय मिळणार का... असा हुंदका देत आदिवासी बांधवांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात घोषणा दिल्या. गावकऱ्यांच्या विरोधामुळे अंत्यविधी करता आला नाही, शासनाला वारंवार कळवूनही कोणीच मदतीला धावले नाही. शेवटी तहसील कार्यालयाच्या आवारातच खड्डा खणून अंत्यविधी करण्याची वेळ आली.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांनी संतप्त होत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की जगतानाही आदिवासींना न्याय नाही आणि मेल्यानंतरही त्यांना शांतता नाही ही राज्यातील सर्वांत मोठी शोकांतिका आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह तहसील कार्यालयाच्या दारामध्ये ठेवणार.
आणि अखेर तहसील कार्यालयात अंत्यविधी करणार, असा इशारा अरुण जाधव यांनी दिला. यानंतर पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून नातेवाईकांना विनंती करून मृतदेह अंत्यविधी पाटेवाडी याच ठिकाणी करण्याची परवानगी दिली, तसेच सायंकाळी पाटेवाडी येथे पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ॲड. कैलास शेवाळे यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
पाटेवाडी येथील वृद्ध महिलेवर तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या सूचनेनुसार दोन पोलीस कर्मचारी, तसेच कामगार तलाठी ग्रामसेवक व गावातील काही प्रमुख व्यक्ती यांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच यापुढील काळात अंत्यसंस्कार करण्यासाठी अर्ज दिल्यानंतर कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देवू असे तहसीलदार यांनी आंदोलकांना सांगितले यावर त्यांचे समाधान झाले. अंत्यसंस्कारास विरोध करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात तक्रारी अर्ज आल्यास गुन्हे दाखल करण्यात येईल.
सोपानराव शिरसाठ पोलीस निरीक्षक