

Police inspector assault blackmail case
नगर: कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विरोधात येथील तोफखाना पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ‘तिच्या’शी कोणताही गैरप्रकार केला नसल्याचे सांगत दोन कोटींसाठी ‘ती’ ब्लॅकमेल करत असल्याचा दावा दराडे यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात केला आहे.
पश्चिम बंगालची पण खासगी नोकरीनिमित्त मुंबईत राहणाऱ्या तीस वर्षीय तरुणीने तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक दराडे यांच्या मेहुण्याच्या मुंबईतील हॉटेलवर ती नोकरीला असताना त्यांची ओळख झाली. प्रामाणिक व होतकरू वाटणाऱ्या तरुणीने दराडे यांच्याकडे परिस्थितीचे कारण सांगत पैशाची मागणी केली. मदत म्हणून दराडे यांनी वेळोवेळी तिला रोख तसेच ऑनलाईन पैसे दिले. (Latest Ahilyanagar News)
मुंबईतील हॉटेल बंद झाल्याने नोकरी गेली. मदतीची याचना करत अहिल्यानगरात पोहचलेल्या तिला दराडे यांनी मदत केली. ओळखीच्या दुकानदाराकडून उधारीवर टीव्ही घेऊन दिला. मात्र तिने पैसे न दिल्याने ती उधारीही दराडे यांनी मिटविली.
दरम्यान, ‘लग्न करा, नाही तर तमाशा करीन’ अशी धमकी देत त्या महिलेने दोन कोटी रुपयांची मागणी करत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचे दराडे यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
त्या महिलेसोबत कोणताही गैरप्रकार केला नाही, परिस्थिती पाहून तिला मदत केल्याचा दावा दराडे यांनी अर्जात केला आहे. तक्रार दाखल करण्याची धमकी देत खंडणी मागितली, खंडणी न मिळाल्याने तिने गुन्हा दाखल केल्याचे दराडे यांचे म्हणणे आहे. तसे पुरावे असल्याचा दावाही दराडे यांनी केला आहे.
बहाणे अन् थेट पोलिस ठाणे!
परदेशात गेले, पैसे संपले. गहाण ठेवलेली सोन्याची चेन सोडवायची, टीव्ही घ्यायचा, गावी जायचे म्हणून विमान तिकीट काढायचे, शिर्डीत आले, अशी कारणे सांगत ‘ती’ पैसे उकळत होती. परिस्थिती पाहून तिला मदत केली. एक दिवस ती कोतवाली पोलिस ठाण्यात आल्याचा उल्लेखही दराडे यांच्या अर्जात करण्यात आला आहे.
नगरमधील अनोळखी पाठीराखा?
अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करून पोलिस दलाची बदनामी करीन, अशी धमकी देणाऱ्या त्या महिलेला पोलिस दलातीलच कोणीतरी अनोळखी प्रवृत्त करत असल्याचा आरोप दराडे यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात केला आहे. दराडे यांच्या हालचालींची माहिती पुरविणाऱ्या तसेच खोटी तक्रार देण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीची चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दराडे यांनी अर्जात केली आहे.