Jeur Police Outpost: जेऊरचे पोलिस दूरक्षेत्र ‘नावालाच’; ना इमारत, ना कर्मचारी, ना सुविधा!

महामार्गावरील गुन्हेगारीसह रोडरोमिओंचा उपद्रव वाढला; ग्रामस्थांचा पुढाकार, मात्र प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा
Police Station
Police Station Pudhari
Published on
Updated on

नगर तालुका: नगर तालुक्यातील सर्वांत मोठ्या गावांपैकी एक असलेल्या जेऊर येथे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे एकमेव पोलिस दूरक्षेत्र कागदोपत्री अस्तित्वात असले, तरी प्रत्यक्षात त्याला ना स्वतंत्र इमारत आहे, ना कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी, ना आवश्यक सुविधा. त्यामुळे ‘दूरक्षेत्र नावालाच’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Police Station
Karjat Crime: कांदा आणल्याच्या कारणावरून सख्ख्या भावाचा बहिणीवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण

तालुक्यातील सुमारे ११० गावांची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी नगर तालुका, एमआयडीसी आणि भिंगार कॅम्प या तीन पोलिस ठाण्यांवर आहे. त्यापैकी सुमारे ६९ गावे नगर तालुका पोलिस ठाण्याच्या, ३१ गावे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या, तर १० गावांचा समावेश भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जेऊर हे एकमेव दूरक्षेत्र असतानाही त्याचे अस्तित्व प्रत्यक्षात जाणवत नसल्याची स्थिती आहे.

जेऊर परिसरातून छत्रपती संभाजीनगर महामार्गासह अनेक अंतर्गत रस्ते जातात. यापूर्वी या मार्गांवर रस्तालुटीच्या घटना घडल्या आहेत. गावाची संवेदनशील पार्श्वभूमी पाहता दोन गटांतील हाणामाऱ्या, सामाजिक तेढ, यात्रोत्सवादरम्यान दगडफेकीची घटना, गोवंश तस्करीविरोधातील कारवाया, तसेच रोडरोमिओंचा उपद्रव यामुळे येथे कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Police Station
Ahilyanagar Kunbi Caste Verification: अहिल्यानगरमध्ये कुणबी जात पडताळणीला वेग; ३७ हजार ८३४ प्रकरणे निकाली

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी आणि पोलिस उपनिरीक्षक मनोज मोंढे यांच्या कार्यकाळात जेऊर परिसरात पोलिसांची नियमित गस्त, गावोगावी बैठका, शाळा-महाविद्यालयांना भेटी, तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांचा वचक निर्माण झाला होता अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचा पदभार सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांनी १३ जून रोजी स्वीकारल्यानंतर अडीच महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे, तरीही जेऊर परिसरात अधिकाऱ्यांची भेट अथवा व्यापक पोलिस उपाययोजनांची ठोस हालचाल दिसून आली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे रोडरोमिओंचा उपद्रव आणि किरकोळ वादांपासून गंभीर गुन्ह्यांपर्यंतच्या घटनांबाबत नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

Police Station
Shrigonda Farmer Assault: गाय खरेदी करून नेणाऱ्या शेतकऱ्याला बेदम मारहाण; कपडे काढून लघवी पाजली, व्हिडिओही काढला

जेऊर पोलिस दूरक्षेत्रासाठी ग्रामस्थांच्या पुढाकारातून तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. ग्रामपंचायतीनेही दूरक्षेत्रासाठी जागा मिळण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. पूर्वी पोलिस उपनिरीक्षक मनोज मोंढे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह तात्पुरत्या जागेची पाहणी करून लवकरच येथून कामकाज सुरू करण्याचे ठरवले होते. परंतु त्यांच्या बदलीनंतर तो विषय रेंगाळत पडला आहे.

दूरक्षेत्रासाठी कायमस्वरूपी इमारत नसल्याने पोलिस कर्मचारी येथे नियमितपणे उपस्थित राहत नाहीत. महामार्गावरील गुन्हेगारी, अपघात, रोडरोमिओंचा उपद्रव आणि इतर गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जेऊरमध्ये कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती, तसेच पोलिस दूरक्षेत्र सुरू करण्याची मागणी जेऊरकरांकडून होत आहे.

Police Station
Ahilyanagar Ganesh Idols: नगरच्या गणेशमूर्तींची परदेशातही क्रेझ; गुजरात, तेलंगणासह कर्नाटकातून मोठी मागणी

ग्रामस्थांचा पुढाकार; प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा!

जेऊर पोलिस दूरक्षेत्रासाठी ग्रामस्थांनी तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. ग्रामपंचायतीनेही जागेबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस कार्यालयाकडे पाठविला आहे. कायमस्वरूपी इमारत उभारणीचा निर्णय होईपर्यंत उपलब्ध जागेतून तरी पोलिस दूरक्षेत्र सुरू करून नियमित कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

ॲक्शन मोडची गरज!

जेऊर परिसरातील वाढता रोडरोमिओंचा उपद्रव, वाद-विवाद आणि संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांनी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. रात्रीची गस्त वाढविणे, शाळा-महाविद्यालय परिसरात पोलिसांची उपस्थिती ठेवणे, संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून पोलिसांनी ॲक्शन मोडवर येण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news