

शशिकांत पवार
नगर तालुका: अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोडरोमिओंच्या उपद्रवामुळे शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींच्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोडरोमिओंच्या वाढत्या उपद्रवामुळे पालक वर्गामध्ये चिंता निर्माण झाली असून रोडरोमिओंचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थिनी तसेच पालक वर्गांमधून होत आहे.
इमामपूर, धनगरवाडी, ससेवाडी, डोंगरगण, पांढरीपुल, आढाववाडी, चापेवाडी, तोडमलवाडी, वांजोळी, खोसपुरी, बहिरवाडी तसेच विविध वाड्या वस्त्यांवरून मोठ्या संख्येने विद्यार्थिनी जेऊर येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी येत असतात. परंतु जेऊर परिसरात रोडरोमिओंचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Ahilyanagar News)
चौकांमध्ये रोडरोमिओंचे घोळके
महाविद्यालय भरण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेस परिसरात तसेच रस्त्यांवर, विविध चौकांमध्ये रोडरोमिओ घोळक्याने बसलेले असतात. धूमस्टाईल दुचाकी चालवणे, कट मारणे, अश्लील हावभाव करणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे असले प्रकार नित्याचेच झालेले आहेत. पालकांकडून शिक्षण बंद होईल, या भीतीपोटी विद्यार्थिनी याबाबत तक्रार करत नाहीत. परिसरात रोडरोमिओंची दहशतही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
दारूच्या नशेत तर्ररर्र् असणार्या टपोरींकडे तर घातक हत्यारेदेखील असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यापूर्वी शिक्षकांना अरेरावी तसेच रोडरोमिओंमध्ये आपापसात हाणामार्या झाल्याच्या घटनादेखील घडलेल्या आहेत.
जेऊर परिसरातील विद्यालये तसेच खासगी क्लासेसही रोडरोमिओेंच्या गराड्यात सापडल्याचे पाहावयास मिळते. भीतीपोटी अनेक पालक काम सोडून विद्यार्थिनींना विद्यालयात नेण्यासाठी व सोडण्यासाठी स्वतः येत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसाही वाया जात आहे. काही पालकांनी तर विद्यार्थिनींचे शिक्षण बंद केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
विद्यार्थिनींच्या शिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
पोलिसांनी शाळा, महाविद्यालय तसेच खाजगी क्लासेस परिसरामध्ये खाजगी गणवेशात गस्त घालून रोडरोमिओबाबत माहिती घ्यावी. कडक कारवाई करावी. रोडरोमिओंच्या जाचापासून विद्यार्थिनी, पालक व ग्रामस्थांची सुटका करावी. अन्यथा पंचक्रोशीतील पालकांकडून विद्यार्थिनींचे शिक्षण बंद करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.