

श्रीरामपूर: तालुक्यात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे निर्माण होणार्या अडचणी श्रीरामपूर एम.आय.डी.सी मध्ये होणार्या 220/33 के.व्ही. विद्युत उपकेंद्रामुळे सुटणार आहे. 60 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प एका वर्षात कार्यान्वीत होवून श्रीरामपूर तालुक्याला पुर्ण दाबाने वीज मिळणार आहे.
त्यामुळे तालुक्यातील व्यापारीकरण, औद्योगिकरण व शेतीचा प्रश्न सुटणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. श्रीरामपूर एम.आय.डी.सी. मधील 220/33 के.व्ही. उपकेंद्राचे भुमीपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. (Latest Ahilyanagar News)
मंत्री विखे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य भारनियमनमुक्त करण्याचा संकल्प सोडला. तसा राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी महायुती सरकारने पावले उचलली आहे. सर्व धरणांवर सव्वातीन लाख कोटीची गुंतवणुक करुन दोन वर्षात हायड्रोपॉलीसीमधून 65 हजार मॅगावॅट वीज निर्मिती होणार आहे.
राज्यातील 40 टक्क्के कृषी फीडर सौर उर्जेवर करण्याचे सरकारचे धोरण आहे. यामुळे राज्यात अतिरिक्त वीजनिर्मिती होवून सामान्य ग्राहकांना 26 टक्क्यापर्यंत वीजदर कमी होणार आहे. सरकारने यापुर्वीच शेतीसाठी साडेसात हॉसपॉवर पर्यंत मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण अवलंबीले आहे. यातून सर्व वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
आ. हेमंत ओगले म्हणाले, श्रीरामपूर एम.आय.डी.सी. मधील 220/33 के.व्ही. विद्युत उपकेंद्र लवकर कार्यन्वीत होणे बाबत आपण विधानसभेत मागणी केली. त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतल्याने वीजेच्या बाबतीत श्रीरामपूर तालुका समृद्ध होणार आहे. तालुक्यातील महावितरण कार्यालयाचे विभाजन करुन बेलापूर उपकेंद्र मंजूर करावे तसेच महावितरणच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात, अशी मागणी केली.
महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार: मंत्री विखे
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. त्याची अंमलबजावणी महायुती सरकार करीत आहे. जलसंपदा विभाग एक लाख कोटी रुपयांची गुंतवणुक करुन दुष्काळमुक्तीसाठी काम करणार आहे. तुटीच्या गोदावरी खोर्यात अतिरिक्त पाणी येणार असल्याने पाणी प्रश्नावर मोर्चे काढून भाषणे करणार्यांना उत्तर मिळणार असल्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
आ. ओगलेंचे भविष्य उज्ज्वल: मंत्री विखे
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यामध्ये शिर्डी, वाकडी, श्रीरामपूर, बेलापूर मार्गे शनिशिंगणापूर रस्त्याचा समावेश करावा अशी मागणी आ. हेमंत ओगले यांनी केली. या पार्श्वभूमीवर ना. विखे यांनी तुम्ही चिंता करु नका, आपण बरोबर रहा, तुमचे भविष्य उज्वल आहे असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.