

जामखेड: शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी उजनी येथून येणाऱ्या दहिगाव पाणीपुरवठा योजनेचा प्राधान्याने पाठपुरावा सुरू असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तसेच जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमातून पाणी शुद्धीकरण केंद्रासाठी (फिल्टर प्लांट) जागाही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या जामखेडकरांना लवकरच दिलासा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.
जामखेड तहसील कार्यालयात आयोजित दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, नगर परिषदेचे गटनेते तात्याराम पोकळे, नगरसेवक मेहेत्रे, विनायक राऊत, तहसीलदार शीतल सावळे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे शशिकांत सुतार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील बोराडे, मुख्याधिकारी अजय साळवे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व पाणी, तसेच दुष्काळ निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तालुक्यातील सातेफळ येथील पिण्याच्या पाण्याच्या उद्भवाची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेण्यात आली. जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा-पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता पिण्याच्या पाण्यासाठी कर्जत तालुक्यातील मांदळी येथूनही जामखेडला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, अशा ठिकाणी चारानिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी मोफत बियाणेवाटप आणि त्यासाठी अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. जनावरांना चारा कमी पडू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, बुधवारी संबंधित अधिकारी व प्रशासकीय यंत्रणेची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत न्यायालयीन आदेश व कायदेशीर प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
जामखेड-बीड रोडवरील अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी यांना पुन्हा निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे रस्त्यावरील उर्वरित अतिक्रमण तत्काळ हटविण्याची, तसेच समर्थ हॉस्पिटल ते खर्डा चौकापर्यंतचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी.
अवधूत पवार, सामाजिक कार्यकर्ते
जामखेड शहर सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत आहे. दहिगाव-जामखेड ही महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना शहरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेची जलवाहिनी खर्डा रोडमार्गे लक्ष्मी चौकापर्यंत येणार आहे. मात्र, खर्डा रोडवरील अनेक ठिकाणच्या अतिक्रमणांमुळे जलवाहिनी टाकण्याच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे खर्डा रोडवरील अतिक्रमणांची मोजणी करून ती तातडीने हटवावीत, रस्त्याचे आवश्यक रुंदीकरण करावे आणि जलवाहिनीसाठी मार्ग मोकळा करून द्यावा.
संजय काशीद, नगरसेवक