

जामखेड: जामखेडचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या तब्बल १८० कोटी रुपयांच्या उजनी ते दहिगावमार्गे जामखेड पाणीयोजनेचे ६७ किलोमीटरपैकी ५३ किलोमीटर पाईपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामात सोलापूर वनविभागाच्या हद्दीतील काही भाग येत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी दूर करण्याची प्रक्रिया सुरू असून, जलशुद्धीकरण केंद्रासह संपूर्ण योजना कार्यान्वित होण्यासाठी आणखी साधारण एक वर्षाचा कालावधी लागू शकतो.
या योजनेला सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या आग्रहाखातर तत्त्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर सन २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेला मंजुरी दिली. प्रत्यक्ष कामाला सन २०२४ मध्ये सुरुवात झाली.
एकूण ६७ किलोमीटरच्या पाइपलाइनपैकी आतापर्यंत ५३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पाइपलाइनच्या कामात सोलापूर वनविभागाच्या हद्दीतील काही भागाचा समावेश असल्याने वनविभागाशी संबंधित तांत्रिक अडचणी सोडविण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. शहरांतर्गत पिण्याच्या पाण्याच्या वितरणाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतिपथावर आहे.
जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी आणि त्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी वेळ लागणार आहे. सर्व कामांना गती दिली तरी जलशुद्धीकरण केंद्रासह संपूर्ण योजना पूर्ण होण्यासाठी साधारण एक वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. नगरपरिषदेकडून ही योजना पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविणे गरजेचे आहे.
दररोज ११ लाख लिटर पाण्याची गरज
जामखेड शहराची अंदाजे लोकसंख्या ५० हजार असून, सात वाड्यांमध्ये सुमारे ५ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. या सर्व लोकसंख्येसाठी दररोज सुमारे १६ लाख 50 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, सध्या दररोज केवळ ६ लाख लिटर पाणी उपलब्ध होत असल्याने पाणीपुरवठ्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
१५ टँकरने पाणीपुरवठा
पाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून सध्या १५ टँकर सुरू आहेत. प्रत्येक टँकरची क्षमता २० हजार लिटर आहे. या टँकरच्या माध्यमातून सुमारे २० हजार नागरिकांना पाणीपुरवठ्याचा लाभ होत असून, प्रतिव्यक्ती दररोज सरासरी ३० लिटर पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
आणखी टँकरचे नियोजन
पाण्याची गरज वाढल्यास आणखी टँकर मंजूर करून घेण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे. कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी १८० कोटींच्या उजनी ते दहिगावमार्गे जामखेड योजनेतील उर्वरित पाइपलाइनचे काम, वनविभागाच्या तांत्रिक अडचणी आणि जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी हे महत्त्वाचे टप्पे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामांना प्रशासनाने गती देण्याची गरज आहे.