

जामखेड: तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींमध्ये १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत १५ विषयांसह शासनाच्या विविध योजनांची माहिती, अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतची कार्यवाही, तसेच नशामुक्ती अभियान यावर चर्चा करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून स्थानिक विकासाला चालना देण्यासाठी या ग्रामसभेत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी सांगितले.
ग्रामसभेत ‘आपला गाव, आपला विकास’ (जीपीडीपी) सन २०२६-२७ आराखड्याला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत कर मागणी, घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांच्या वसुलीचा आढावा घेण्यात येणार आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवांबाबतही विचारविनिमय केला जाणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा व नियोजन केले जाणार आहे.
आवास प्लसची प्रतीक्षा यादी अंतिम होणार
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस २०२४ सर्वेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्याबाबत ग्रामसभेत चर्चा होणार आहे. तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील पात्र, मात्र अद्याप स्वयंसहायता गटात सहभागी नसलेल्या महिलांचे नवीन बचत गट स्थापन करण्याबाबत नियोजन केले जाणार आहे.
भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण व जंतनाशक औषधोपचार, ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ आणि ‘टी.बी. मुक्त पंचायत’ अभियानाच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा करण्यात येणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन, बालविवाहमुक्त गावावर भर
घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६ची अंमलबजावणी, बालविवाहमुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, तसेच वृक्षलागवड कार्यक्रम-२०२६ अंतर्गत लागवड केलेल्या वृक्षांचे संरक्षण व पाण्याची व्यवस्था याबाबत ग्रामसभेत आढावा घेतला जाणार आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत पूर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनांची चाचणी घेऊन विहित पद्धतीने त्या ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करून घेण्याबाबतही कार्यवाही केली जाणार आहे. गावातील शाळा व अंगणवाडीच्या विकासासाठी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत चर्चा व नियोजन केले जाणार आहे.
२०११पूर्वीच्या अतिक्रमणांबाबत माहिती
दरम्यान, २५ मार्च २०२६च्या शासन निर्णयानुसार सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत ग्रामस्थांना माहिती देऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या मुद्द्यावरही ग्रामसभेत चर्चा होणार आहे. शासनाच्या विविध योजना व निर्णयांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रसिद्धी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
नशामुक्तीसाठी जनजागृती
गावात नशामुक्ती अभियान राबविणे, युवक व नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे आणि ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही ग्रामसभेत चर्चा केली जाणार आहे.
ग्रामसभेला बचत गटातील महिला, ग्रामसंघ व प्रभागसंघ सदस्यांना निमंत्रित करण्यात यावे, तसेच ग्रामसभेची गणपूर्ती होण्यासाठी व्यापक प्रचार-प्रसिद्धी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तालुक्यातील सर्व ६० ग्रामपंचायतींनी शासन निर्देशानुसार ग्रामसभांचे आयोजन करून आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी केले आहे.