

श्रीरामपूर: कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने बुधवारी (दि. १२) १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी 'ऑल आऊट ऑपरेशन' व कोंबिंग ऑपरेशन राबवले. या मोहिमेत अवैध भंगार दुकानांवरील धाडी, कॅफेवरील कारवाई, १२ फरार गुन्हेगारांची धरपकड, ५.६० लाखांचा गांजा, बेकायदेशीर शस्त्रे आणि दारू-जुगार धंद्यांवर धडक कारवाई करण्यात आली.
श्रीरामपूर शहर परिसरातील वाहने व पार्टस् चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील बेकायदेशीर भंगार दुकानांची झाडाझडती घेतली. वाहनांची कागदपत्रे व मालकीहक्क सिद्ध न करू शकल्याने आसिफ दाऊद तांबोळी (यारा टायर्स), फिरोज रसुल शहा (डी.एम. टायर्स), अनिस हारून शहा, तसेच सुलेमान दादामियों शहा, शकिल इब्राहिम शहा व आसिफ हारून शहा या ६ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या धाडींमध्ये ३४ हून अधिक संशयास्पद चारचाकी वाहने, ३ ट्रॅक्टर, २५ इंजिन, ५० गियर बॉक्स, ३० रेडिएटर, शेकडो दरवाजे, काचा व टायर्स असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील कॅफेचीही तपासणी करण्यात आली. नेवासा रोडवरील 'स्नॅप कॅफे' येथे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या सचिन पांडुरंग गायके (रा. निमगाव खैरी) याच्यावर कारवाई झाली. तसेच उपाध्ये मळा येथून मयूर राजेंद्र वाघ (रा. नेवासा) व त्याच्या साथीदारांकडून ४ किलो गांजा आणि आलिशान कार असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला.
कोपरगावमधून कपिल राजू पिंपळे व राहुरीतून यश विठ्ठल जगधने या सराइतांकडून तलवारी जप्त करण्यात आल्या. या विशेष मोहिमेत अनेक वर्षांपासून फरार असणाऱ्या १२ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या. न्यायालयाच्या १०० अजामीनपात्र व १४६ जामीनपात्र वॉरंट आणि ३३८ समन्स बजावण्यात आले.
अवैध दारूविक्रीप्रकरणी ४० आणि जुगारावर १८ गुन्हे दाखल करण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३२२ वाहनचालकांकडून २ लाख ५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ड्रिंक अँड ड्राईव्हचे ३ गुन्हे दाखल झाले. शहरात अवैध धंदे, चोरीची वाहने खरेदी करणारे भंगार व्यावसायिक व बेकायदेशीर कॅफेवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.