

नगर: जिल्हा बँकेची प्रारूप मतदारयादी जाहीर होण्यापूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईतील बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने थेट अध्यक्षपदावर दावा सांगितल्याने महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, बँक निवडणुकीत निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चार आमदारांसह सहा जणांची समिती नियुक्त केली असून, प्रसंगी स्वबळाची तयारी करण्याच्याही सूचना केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सह्याद्री बंगल्यावर भेट घेतली. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ संचालक सीताराम गायकर, आमदार आशुतोष काळे, आमदार काशीनाथ दाते, प्रशांत गायकवाड, राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, अरुण तनपुरे, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अशोक सावंत या नगरच्या नेत्यांची पवार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत बँक निवडणुकीबाबत चर्चा झाली.
या बैठकीत स्थानिक नेत्यांनी जिल्हा बँकेची राजकीय स्थिती सांगितली. बँक पहिल्यापासून राष्ट्रवादीच्याच ताब्यात आहे, पुढेही ती असावी, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर पवार यांनी जिल्ह्यातील पक्षाचे आमदार संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, आ. किरण लहामटे आणि आ. काशिनाथ दाते यांच्यासह माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर यांची समिती नियुक्त केली. या समितीच्या माध्यमातून बँकेचे मतदारसंघ, त्यातील मतदार सभासद यांचा अभ्यास केला जावा, तसेच राजकीय जुळवाजुळवीसाठी आवश्यक भेटीगाठी घेतल्या जाव्यात, अशा सूचनाही समितीला करण्यात आल्या. अगोदर आपली तयारी ही स्वबळाची असावी, त्यासाठी सर्वच्या सर्व २१ जागांवर ताकदीने तयारी करून ठेवा, असा सूचक संदेश देण्यात आला. महायुतीला प्राधान्य दिले जाईल, त्यासाठी अध्यक्षपदासह संचालक मंडळाच्या जागावाटपाबाबतही मित्रपक्षाशी हीच समिती वाटाघाटी करील. त्यानंतर पक्ष अंतिम निर्णय घेईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितल्याचे सूत्रांकडून समजते.
मला नको, प्रशांतला द्या; आ. दातेंचे दातृत्व
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर इच्छुकांची माहिती घेण्यात आली. या वेळी पारनेरमधून आमदार काशीनाथ दाते यांना विचारणा करण्यात आली. त्या वेळी ‘मला नको, आमचा प्रशांत आहे, त्यालाच पुन्हा बँकेत पाठवू,’ असे सांगून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला! प्रशांत गायकवाड हे बिगरशेती मतदारसंघातून संचालक असून, या वेळीही हाच मतदारसंघ मिळावा, अशी मागणी त्यांनी केल्याचे समजते.
सुनेत्रा पवार बँकेत लक्ष देणारच
गेल्या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे होते, त्यामुळे त्यावर पक्षाचा दावा असल्याचे नेत्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर पवार यांनी अध्यक्षपदावर पक्षाचा दावा कायम असल्याचे नमूद करताना त्याच दिशेने तयारी करावी, अशा सूचना केल्या.
राजेंद्र नागवडे - राहुल जगताप यांच्यात समझोता?
दोन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा दौऱ्यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजेंद्र नागवडे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्या वेळी भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुतेही उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाचपुते - नागवडेंचे मनोमिलन झाल्याचा दावाही केला गेला. मात्र त्यानंतर राजेंद्र नागवडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीप्रसंगी बुधवारी उपस्थित होते. या भेटीत श्रीगोंद्यातील राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली. त्यात राहुल जगताप व राजेंद्र नागवडे दोघेही संचालक कसे होतील, यादृष्टीने व्यूहरचना आखली गेल्याचे समजते. आता राजेंद्र नागवडे भाजपचे आमदार पाचपुते यांच्यासोबत जातील, की पक्षाचे सहकारी माजी आमदार राहुल जगताप यांची साथसंगत करतील? याबाबत उत्सुकता आहे.