

जामखेड: शहरासह तालुक्यात पेट्रोल व डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांवर इंधन मिळत नसल्याने शेतकरी, वाहनधारक व लहान व्यावसायिक अक्षरशः हैराण झाले आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीची कामे सुरू असताना इंधन टंचाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
एप्रिल व मे महिन्यांत नांगरणी, मोगडा, जमीन सपाटीकरण, अशी विविध कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. मात्र, डिझेलअभावी ट्रॅक्टर बंद पडले असून, अनेक शेतकऱ्यांची कामे अर्धवट राहिली आहेत. त्यामुळे आगामी खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काही पेट्रोल पंप चालकांकडून मनमानी होत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. काही ठराविक वाहतूकदार व ओळखीच्या लोकांनाच इंधन दिले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. सर्वसामान्यांना तासन्तास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
तालुक्यात परिस्थिती अधिकच बिकट आहे. अनेक गावांमध्ये शेतकरी ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. तसेच दुचाकीधारकांना रोजच्या कामासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शालेय विद्यार्थी, कामगार व छोटे व्यापाऱ्यांवरही परिणाम होत आहे.
काही पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लावले जात आहेत. काळाबाजाराची शक्यता नाकारता येत नाही, तसेच काही डिझेल मध्ये पाणी, तर काहींमध्ये मापात पाप करण्याचे काम देखील काही पंपचालक करीत असल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी प्राधान्याने डिझेल मिळत नाही
ही टंचाई नसून व्यवस्थेचा अपयश आहे. प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून पंपचालकांची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक वाहनधारकांनी केली आहे. तालुक्यातील नागरिकांनी तहसील प्रशासन, पुरवठा विभाग व जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून: इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.
पंपचालकांशी चर्चा करणार: बांगर
शहरासह ग्रामीण भागात डिझेल व पेट्रोलची काही प्रमाणात टंचाई आहे. विशेष ग्रामीण भागातील काही पंपावर टंचाई आहे. लवकरच टंचाईबाबत बैठक घेऊन याबाबत उपाययोजना करता येतील का याबाबत सविस्तर चर्चा पंपचालकांशी करणार असल्याचे तहसीलदार बांगर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना डिझेल द्या
डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. सोशल मिडियामध्ये भाव वाढणार आहेत, अशा अफवा पसरविल्या जात आहे. त्यामुळेही कृतिम टंचाई निर्माण आली आहे का? भाव वाढणार असणार तर वाढवा, पण पावसाळ्याच्या तोंडावर डिझेल टंचाई नको, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
आम्ही कंपनीकडे दररोज डिझेलची नियमित मागणी करीत आहोत. मात्र, आम्हाला अपेक्षित प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे पंपावर सतत पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो.
दादासाहेब सरनोबत, राहुल पेट्रोलपंप, जामखेड