

डॉ. सूर्यकांत वरकड
नगर: अहिल्यानगर राज्यातील सर्वात मोठा जिल्हा तसा क्राईम रेशोतही पुढे. तुलनेत मनुष्यबळ मात्र तोकडे. याही परिस्थितीत शंभर टक्के पोलिसिंग करण्यावर भर देत कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर गावठी कट्टे आणि ड्रॅग्ज तस्करीच्या मुळापर्यंत जावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार असल्याचा मनोदय नूतन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.
मुम्मका यांनी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. जिल्ह्यातील गुन्हेगारी, पोलिस ठाणे, पोलिस चौक्या आणि पोलिस दलाचे मनुष्यबळाचा आढावा ते घेत आहेत. मुम्मका यांनी ‘पुढारी’शी संवाद साधला. अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यातील क्राईम रेटमध्ये फरक आहे. 50 ते 55 लाख लोकसंख्येच्या तुलतेन तुलनेत मनुष्यबळ तोकडे आहे. अवघ्या 3200 पोलिस कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी आहे.
याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस सचोटीने प्रयत्न करतात याचे मुम्मका यांनी कौतूक केले. आगामी काळातही कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केली जातील. जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत परिस्थिती काय, कोणत्या पोलिस ठाण्याचा क्राईम रेट सर्वाधिक आहे. तसेच, तेथील राजकीय परिस्थितीचा आढाव घेतल्यानंतर ‘काम बोलेल’ असा विश्वास मुम्मका यांनी व्यक्त केला.
पोलिस चौक्या, दामिनी पथक अन् ट्राफीकही
जिल्ह्यातील अनेक पोलिस चौक्या बंद आहेत. त्या सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील. तेथील उणीवा शोधून त्यावर उपाय करण्यात येईल. अहिल्यानगर शहर वाहतूक शाखा पोलिसांची बैठक घेवून त्यांना ॲक्टिव करू. त्यातून वाहतुकीला शिस्त लागेल. याचसोबत वाढत्या छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शाळा व महाविद्यालयाच्या आवारात कारवाई करणारे दामिनी पथक प्रत्येक पोलिस ठाण्यात नेमण्याचा प्रयत्न असल्याचे पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी सांगितले.
पोलिस ठाण्यात समाधान न झालेले अनेक तक्रारदार थेट पोलिस अधीक्षकांच्या भेटीला येतात. पोलिस ठाण्यात तक्रारदारांचे शंकानिरसन होईल. तक्रारीचा तिथेच निपटारा होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी पोलिसांना संवादी बनवणाऱ्यावर भर दिला जाईल.