खेड: नांदणी नदीला आलेल्या पुरामुळे खेड-शिंपोरा रस्त्यावरील पूल कोसळून गावांचा संपर्क तुटला आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य जनतेच्या दळणवळणावर मोठा परिणाम झाला असतानाच, विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, पूल तुटला तरी शिक्षण थांबणार नाही, या भूमिकेने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे.
सभापती शिंदे यांनी नुकतीच शिंपोरा गावात भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या वेळी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास होणार्या अडचणींबाबत त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. पूल कोसळल्यामुळे शाळा भरल्यानंतर विद्यार्थ्यांना पावसात, ओढे ओलांडत शाळेत जावे लागणार होते, हे पाहून सभापतींनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधत उपाययोजना सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले. (Latest Ahilyanagar News)
सभापतींच्या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना तात्पुरत्या स्वरूपात जुना शिंपोर्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. तसेच संबंधित गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकार्यांनाही याबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावाचा संपर्क तुटला असला, तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या एकत्रित प्रयत्नांना आता प्रत्यक्ष परिणाम दिसणार आहे.
जुना शिंपोर्यात लवकरच तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती असून, त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबणार आहे. सभापती राम शिंदे यांच्या या पुढाकाराचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
‘त्या’ पुलासाठी तब्बल 5 कोटींचा प्रस्ताव
कर्जत तालुक्यातील खेड-शिंपोरा रस्त्यावरील वाहून गेलेल्या पुलाची पाहणी करत त्यांनी नव्या पुलाचे तत्काळ प्रस्ताव तयार करून सरकारकडे सादर करण्याच्या सूचना केल्या. सभापती राम शिंदे यांनी या गंभीर परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत पुलाच्या तातडीच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे 5 कोटींच्या अंदाजपत्रकासह प्रस्ताव तयार करून सरकारला सादर करण्याचे निर्देश दिले. याबाबत ग्रामविकासमंत्री यांनाही या संदर्भातील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नवीन पूल उभारणीसाठीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.