Ahilyanagar News: ‘अवकाळी’ने बळीराजाच्या डोळ्यात पाणी! पिकांची मोठी हानी; नुकसान भरपाईची मागणी
नगर: उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, टाकळीभानसह राहुरी, राहाता, संगमनेर, कोपरगाव व अकोले तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. वादळ-वार्यासह पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संततधार पावसाने शेतकर्यांसह नागरिक अक्षरशः अहवालदिल झाले आहेत. दरम्यान, ‘अवकाळी’ने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून, तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे. (Ahilyanagar News Update)
गेल्या चार - पाच दिवसांपासून तालुक्यातील मुळा, प्रवरासह आढळा पट्ट्यात विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घालून झोडपले आहे. अगदी पावसाळ्यातही न पडणारा ‘अवकाळी’ लहरीप्रमाणे बरसत आहे. दरम्यान, समशेरपूर मंडळात पावसामुळे कांदा, भुईमूग, बाजरीसह भाजीपाला व उन्हाळी धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 9 गावांमध्ये 54 घरांची पडझड झाली आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आमदार डॉ. किरण लहामटे यांनी ‘अवकाळी’न झालेल्या शेतकर्यांच्या बांधावर जाऊन, नुकसानीची पाहणी केली. अकोले तालुक्यात 9 दिवसात एकूण 1, 197 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
तालुक्यात बर्याच शेतकर्यांकडे सिंचनाची सुविधा असल्याने ते उन्हाळी धानाची लागवड करतात. बहुतांश भागात उन्हाळी धान पिकाची मळणी सुरू आहे. उन्हाळी धान पिकाची मळणी यंत्राच्या साहाय्याने केली जाते. मळणीनंतर काही दिवस धान वाळवावे लागते, मात्र अवकाळी पावसाने थैमान अक्षरशः घातल्याने धान वाळत नसल्याने खराब होण्याचा धोका वाढला आहे. प्रचंड वादळामुळे धान पिक आडवे पडले आहे. धानाच्या बांध्यांमध्ये पावसाचे पाणी साठले आहे. ‘अवकाळी’मुळे टोमॅटोवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. बाजरी, भुईमूग व टोमॅटोचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात साठविलेल्या कांद्याचे ‘अवकाळी’मुळे मोठे नुकसान झाले आहे.
आढळा शिवारात भाजीपाला उत्पादक शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. अकोले मंडळात 261 हेक्टर, राजूर मंडळात 33 हेक्टर, कोतुळ मंडळात 1.20 हेक्टर, समशेरपूर मंडळात 484 हेक्टर अशा एकूण 4 मंडळात सुमारे 778 हेक्टर क्षेत्रात टोमॅटो, भुईमूग, भाजीपाला, बाजरीसह उन्हाळी धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, तालुका कृषी व तलाठी संयुक्तपणे नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून, पंचनामे करीत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ‘अवकाळी’ बरसत असल्याने अनेकांच्या वीटभट्ट्यांचे नुकसान झाले आहे. आदिवासी भागात या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
‘भंडारदरा धरणात 2,99, तर ‘निळवंडे’मध्ये 66 दशलक्ष घनफुट पाण्याची नव्याने आवक
सलग चार - पाच दिवस हरिश्चंद्रगड गड, कळसूबाई शिखरासह कुमशेत, पाचनई, घाटघर, अंबित, पाजरे, रतनवाडी, कोंलटेंभे परिसरात मुसळधार ‘अवकाळी’ने हजेरी लावल्याने मान्सूनपूर्वीच नदि-नाल्यांमध्ये खळखळाट ऐकू येत आहे. भंडारदरा धरणात 2,99 दशलक्ष तर, निळवंडे धरणात 66 दशलक्ष घनफुट नवीन पाणी आल्याची नोंद ‘पाटबंधारे’च्या रजिस्टरमध्ये झाली आहे. अकोले तालुक्यात 9 दिवसात एकूण 1, 197 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
संपूर्ण पंचनामे होणार कधी..?
कांदा, बाजरी,भुईमूग, भाजीपाल्यासह उन्हाळी धान पिकांचे ‘अवकाळी’मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून, नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजासह नुकसानग्रस्तांकडून होत आहे. मळणी झालेले धान भिजले, त्यांनाही नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. खरीप पिकांची लागवड करण्यापूर्वी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
6 गावांमधील घरांवरील पत्रे उडाले
अकोले तालुक्यात ‘अवकाळी’मुळे 54 घरांची पडझड झाली, तर एकाचा मृत्यू झाला आहे. ‘अवकाळी’मुळे राजूर 5, लिंगदेव 4, अकोले 10, विरगाव 18, खिरविर 2, रुंभोडी 5, साकीरवाडी 3, कोतुळ 1 व ब्राम्हणवाडा या 6 गावांमधील घरांवरील पत्रे उडाले. भिंतींच्या पडझडीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

