

नगर: सीना नदीपात्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वनस्पती पसरली आहे. नाले सफाई मोहिमेत याची स्वच्छता होण्याची गरज होती. मात्र हे काम अपूर्ण आहे. परिणामी मान्सून सुरू होण्यापूर्वीच अवकाळी पावसाच्या पाण्यातून नदीला पूर आला आहे. शहराच्या बाजारपेठेसह सावेडी, केडगाव, बोल्हेगाव, नागापूर सर्वच उपनगरांमध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांना गाडीवरून प्रवास करणे अशक्य होत आहे. मनपाच्या या हलगर्जीपणाबद्दल शिवसेनेच्या ठाकरे गटाने प्रशासनावर आरोप केले आहे. (Ahilyanagar News update)
सीना नदीवरील नगर कल्याण रोडवरील प्रस्तावित पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. अनेक वेळा याची पाहणी झाली. आश्वासने दिली गेली. मात्र प्रत्यक्षात आजवर कामाला सुरुवात नाही झाली. विशेषतः वारुळाचा मारुती, नेप्ती नाका, कायनेटिक चौका जवळील सीना नदीवरील पूल या परिसरामध्ये काही ठिकाणी पुलाच्या वरून तर काही ठिकाणी पूलाला लागून पाणी वाहते आहे.
सीना नदी पात्राच्या खोलीकरण व रुंदीकरणाचा विषय देखील प्रशासन मार्गी लावू शकलेले नाही. सीना आता नदी राहिली नसून त्याचा नाला झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे जनजीवन, दळणवळण सुरळीत चालायचं असेल तर आता एकच पर्याय उरला आहे. मनपा प्रशासनाने तात्काळ नागरिकांना होड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी खोचक जाहीर मागणी ठाकरे गटाने किरण काळे यांनी केली आहे. तसेच आपत्ती काळात शिवसेनेशी संपर्क साधा, असे आवाहनही नगरकरांना केले आहे.