

अकोले : मुसळधार पावसामुळे हरिश्चंद्रगड परिसरात ओढ्या, नाले आणि मुळा नदी दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत नाशिक वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयाने १० ऑगस्ट २०२५ पर्यंत हरिश्चंद्रगडावर पर्यटकांना प्रवेश बंदीचा आदेश दिला आहे. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत शनिवारी आणि रविवारी हजारो पर्यटकांनी गडावर गर्दी केली. या दोन दिवसांत वन्यजीव विभागाने पर्यटकांकडून तब्बल ६१ हजार रुपयांचा कर वसूल केला.
हरिश्चंद्रगड परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून, वातावरणात गारवा आणि दाट धुके पसरले आहे. पाचनई, पेठेवाडी, लव्हाळी, कुमशेत या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तरीही पुणे, नाशिक, मुंबई, इंदूर, सोलापूर आदी जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक गडावर पोहोचले. वन्यजीव चेकनाक्यावर झालेल्या नोंदींनुसार, पर्यटकांकडून ६१ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला.
गेल्या वर्षी धुक्यात वाट हरवलेल्या एका पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही, यंदा देखील बंदी आदेशाचा पुरेसा प्रभाव दिसून आला नाही. मुसळधार पावसामुळे गडावर जाणाऱ्या वाटा निसरट झाल्या असून, दाट धुक्यात गडावर जाणे धोकादायक ठरत आहे. तरीही अनेक पर्यटक धबधब्यांखाली सेल्फी काढताना, मद्यपान करताना आणि गाण्याच्या तालावर नाचताना दिसून आले. वन्यजीव विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी मात्र या ठिकाणी अनुपस्थित होते.
राजूर वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांनी उपवनसंरक्षकांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून पर्यटकांना प्रवेश दिल्याचा आरोप होत आहे. या विभागाने केवळ कागदोपत्री बंदी आदेश काढला असून, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यावरच बंदीची अंमलबजावणी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
हरिश्चंद्रगड परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मात्र, अपघात टाळण्यासाठी आणि दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी बंदी आदेशाचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. पर्यटकांसाठी सूचना फलक, गाईड, निवारा आणि तातडीच्या मदतीसाठी वन्यजीव विभागाचे पथक तैनात करणे गरजेचे आहे. अन्यथा, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अभयारण्यातील राजुर (वन्यजीव) वनक्षेत्रातील गड-किल्ले, पर्यटनस्थळे मुख्यतः हरिश्चंद्रगड या ठिकाणी पर्जन्यमान जास्त असल्याने पर्यटनस्थळांवरील वाटा निसटत्या झाल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सदर क्षेत्रात दुर्मिळ प्रजातींचे वनस्पतींचा अधिवास असुन सदर क्षेत्रात दुर्मिळ प्रजातींचे वनस्पतींचे संवर्धन करण्यात येत आहे. या कारणास्तव दि.१० ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रवेशबंदी करण्यात येत असल्याचा आदेश तात्कालिन उपवनसंरक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली चक्क राजूर वन्यजीव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हरिचंद्र गडावर प्रवेश करणाऱ्या पर्यटकांकडून कर घेऊन पर्यटकांना प्रवेश दिला असल्याने उपवनसंरक्षकाचे नियमाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या वन्यजीव विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत जाणकारांमधून व्यक्त होत आहेत.