

खेड: गणेशवाडी (ता.कर्जत) येथील शेतकरी संतोष कायगुडे यांनी केळीचे एकरी तब्बल 30 टन उत्पादन घेतले आहे.त्यांनी जी-9 (जैन कंपनी) जातीची केळी 3 एकर क्षेत्रावर साडेसात फूट अंतरावर लागवड केली होती. ही लागवड 1 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली असून, फेब्रुवारी 2026 मध्ये हार्वेस्टिंग पूर्ण झाली. सध्या या केळीची निर्यात होत असून त्यांना प्रति किलो 16 रुपये 50 पैसे दर मिळाला आहे.
संतोष कायगुडे हे पारंपरिक शेतकरी कुटुंबातील असून त्यांना लहानपणापासून शेतीची आवड आहे. सध्या ते केळी, डाळिंब व ऊस ही पिके घेत असून त्यांच्या शेतात 3 एकर केळी व 3 एकर डाळिंब आहे. हे अमूल्य यश संपादन करण्यासाठी गणेशवाडीतील ’अँग्रीकॉस कृषी उद्योग समूह’ या कृषी सेवा केंद्राचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या केंद्राचे प्रमुख गणेश मराळे हे कृषी पदवीधर असून, त्यांना 8 वर्षांचा शेती क्षेत्रातील अनुभव आहे.
त्यांच्या मार्गदर्शनातून गणेशवाडी परीसरातील शेतकऱ्यांना योग्य औषधे, विद्राव्य खते व तांत्रिक सल्ला मिळत आहे. तसेच फर्टीन ॲग्रो बायोटेक (स्पेन) या कंपनीचे महाराष्ट्र राज्य प्रमुख अभिजित जोंधळे यांनीही दरमहा शेताला भेट देत सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या कंपनीची खासियत म्हणजे ऑरगॅनिक तत्त्वांवर आधारित अल्गो-व्हायटल बेस व विविध ग्रेडची विद्राव्य खते, ज्यामुळे पिकाची गुणवत्ता व उत्पादन दोन्ही वाढल्याचे दिसून आले.
सध्या या मार्गदर्शनामुळे गणेशवाडीत सुमारे 50 एकर केळी व 50 एकर डाळिंब लागवड सुरू असून, अनेक शेतकऱ्यांना उत्पादन व दर्जामध्ये स्पष्ट फरक जाणवत आहे. त्यामुळे एकेकाळी उसाचे आगार समजल्या जाणाऱ्या गणेशवाडीत बागा बहरू लागल्या आहेत.
योग्य मार्गदर्शन, वेळेवर औषध-खते व तांत्रिक सल्ला मिळाल्यामुळे मला एकरी 30 टन उत्पादन मिळाले. निर्यात दर्जाचे केळी उत्पादन घेणे शक्य झाले. योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक पद्धती वापरल्यास शेती नक्की फायदेशीर ठरते आहे.
संतोष कायगुडे, शेतकरी
शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्यासाठी योग्य मार्गदर्शन, दर्जेदार इनपूट व सतत फील्ड व्हिजिट देणे हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचा नफा वाढताना दिसत आहे.भविष्यात इथल्या शेतीची दखल घेतली जाईल.
गणेश मराळे, अँग्रीकॉस कृषी उद्योग समूह, गणेशवाडी