

सोनई: पुजार्यामार्फत शनिदेवाची पूजा, अभिषेक आणि तेल चढावा करण्याच्या नावाखाली अॅपद्वारे पैसे उकळून देवस्थान व भाविकांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. फसवणुकीच्या उद्देशाने संकेतस्थळावर खोटा मजकूर ऑनलाईन प्रसारित केल्याने अज्ञात अॅपधारक, मालक व साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुदाम काकासाहेब काकडे यांनी शिंगणापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यासंदर्भात देवस्थानने सायबर पोलिसांकडे अर्ज दिला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने संशयित अॅप व संकेतस्थळांची तांत्रिक चौकशी करण्यात आली. (Latest Ahilyanagar News)
त्यात शनैश्वर देवस्थान व धर्मादाय आयुक्तांची ऑनलाइन दर्शन पूजा अभिषेक व तेल चढावा बुकिंग करता कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले. देवस्थानला कोणत्याही प्रकारची देणगी न देता संकेतस्थळ व अॅपधारक, मालकाने शनि महाराजांच्या शिळेचा फोटो, शनी मंदिराचा व महाद्वाराचा फोटो वापरला.
कोणतेही अधिकृत पुजारी शिंगणापूर येथे उपलब्ध नसताना पुजारी मार्फत श्री शनैश्वर देवस्थान येथे शनि देवाची पूजा अभिषेक व तेल चढावा केला जाईल असा खोटा मजकूर फसवणुकीच्या उद्देशाने संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रसारित करण्यात आलाा. भाविकांकडून ऑनलाईन पद्धतीने अनियमित दराने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रक्कम स्वीकारून शनैश्वर देवस्थान व भाविकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ भीमाशंकर दरंदले, शनैश्वर देवस्थान व संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ केरुजी दरंदले यांना वेळोवेळी संपर्क साधून संकेतस्थळ/ अॅपधारक मालक विरोधात फिर्याद देण्यास कळवुनही त्यांनी फिर्याद न दिल्याने संवेदनशील व भाविकांच्या भावनांशी संबंधित असल्याने भाविकांची व संस्थांनची होणारी फसवणूक थांबण्यासाठी सायबर पोलिसांनी फिर्याद दिली आहे.
भारतीय न्याय संहिता कलम 318(4),336(3),3(5) सह माहिती व तंत्र तंत्रज्ञान अधिनियम चे कलम 66ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर शाखेचे पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम अधिक तपास करत आहेत.
पाच अॅपद्वारे फसवणूक
भाविकांच्या पूजा अभिषेक व तेल चढावासाठी घर मंदिर, ऑनलाईन प्रसाद, पूजा परिसेवा, हरिओम व ई पूजा असे पाच अॅप, संकेतस्थळ वापरण्यात आल्याचे पोलिस चौकशीत समोर आले. ऑनलाइन दर्शन, पूजा, अभिषेक व तेल चढावा बुकिंग करता शनैश्वर देवस्थान व धर्मादाय आयुक्तांची कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी घेतली नाही. तसेच देवस्थानला कोणतीही देणगी न देता शिळा, मंदिराचे फोटो वापरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.