

संदीप रोडे
शिर्डी, पंढरपूरच्या धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थानावर शासन नियुक्त मंडळ येणार असल्याची घोषणा पाच-सहा वर्षांपूर्वी अशीच कानावर पडली होती; पण त्या वेळी घोटाळ्याचा वास त्यामागे नव्हता, तर होता तो गैरव्यवहार, अनियमिततेचा आरोप. तत्कालीन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्या वेळी हा मुद्दा उचलून धरल्याचे आठवते.
आता तोच मुद्दा विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नव्याने मांडला. मात्र यंदा त्यात बनावट अॅपची भर पडली, हेच काय ते वेगळेपण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीवर उत्तर देताना विश्वस्त मंडळ बरखास्तीची घोषणा करताना पुन्हा शासन नियुक्त मंडळ नियुक्तीचे सूतोवाच केले. आता हे शासन नियुक्त मंडळ कधी येणार, हे पाहावे लागेल! शनीला तेल अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र आता तेथे भ्रष्टाचाराच्या तेलाचे लोट वाहू लागल्याचे दिसते. या तेलात कोणाकोणाचे हात माखले, हेही यथावकाश पुढे येईलच... (Latest Ahilyanagar News)
कर्मचारी भरती आणि बनावट अॅपद्वारे कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याचा आरोप झाल्यानंतर शनिशिंगणापूर देवस्थानमधील कारभाराचा पाढा खुद्द मुख्यमंत्र्यांनीच विधीमंडळात वाचला अन् सगळेच अवाक् झाले. दोषींवर कारवाई केली जाईल अन् त्यानंतर शासन नियुक्त समिती नियुक्त करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
विद्यमान विश्वस्त मंडळ नियुक्तीपूर्वी शिंगणापूरचा मुद्दा चर्चेला आला होता. तेव्हाही शासन नियुक्त समितीची घोषणा झाली होती. मात्र प्रत्यक्षात पाच वर्षांनंतरही ती प्रत्यक्षात साकार झाली नाही. त्यामुळे आताही विधीमंडळात घोषणा झाली पण हे शासननियुक्त विश्वस्त नेमके कधी नियुक्त होणार? अशी चर्चा सुरू झाली. त्यामागील कारणही तसेच. डिसेंबर 2025 अखेरपर्यंत विश्वस्त मंडळाची मुदत संपते आहे. त्यानंतर शासन नियुक्त मंडळ येणार की अगोदर? हा प्रश्न आहे.
नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी विधीमंडळात देवस्थानची लक्षवेधी मांडली. शंभर कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे ते म्हणाले. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्याहीपुढे जात घोटाळा 500 कोटींवर पोहचल्याचे सांगताना ट्रस्टीच 10 कोटींचे जमीन व्यवहार करत असल्याची वेगळीच धक्कादायक माहिती मांडली.
लंघे हे शिवसेनेचे (शिंदे गट) तर धस हे भाजपचे आमदार आहेत. शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त वेगळे असले तरी त्यांचा कारभार माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचा दावा आहे. असे असेल तर ‘देवस्थान’आडून कोण कोणावर निशाणा साधतंय का? अशा शंकेची पाल प्रत्येकाच्या मनात चुकचुकल्याशिवाय राहत नाही.
अर्थात आता पुन्हा एकदा देवस्थानच्या कारभाराची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्याबाहेरचे अधिकारी नियुक्त होणार असल्याने त्यातून सत्य काय ते समोर येईलच. पण तोपर्यंत भ्रष्टाचाराच्या साडेसातीचा फेर्यात कोण कोण अडकणार? याची चर्चा गावागावातील पारांवर रंगेल.
शिंगणापूर देवस्थानची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी आहे. त्यामुळे त्या अधिनियमाच्या आधारे देवस्थानचा कारभार अपेक्षित आहे. विश्वस्त मंडळाचा ठराव, त्याला धर्मदाय कार्यालयाची मान्यता घ्यावी लागते. येथे मात्र अशी कोणतीच मान्यता घेतली नसल्याचे दिसते. त्यामुळेच 258 कर्मचार्यांची आस्थापना असलेल्या शनी देवस्थानात नोकरदारांचा आकडा थेट 2447 वर पोहचला. देवस्थानची स्वत:ची मालमत्ता आहे.
त्यात स्वत:चे रुग्णालयही आहे. तेथील खाटा आहेत 15 अन् डॉक्टर आहेत 80. त्यापुढेही गंमत म्हणजे 247 अकुशल कामगारही तेथे आहेत. वानगीदाखल हे उदाहरण पुरेसे ठरावे. मालमत्तेची सुरक्षा, देखभालीसाठी ही नोकरभरती झाल्याचा खुलासा आता देवस्थान करेलही; मात्र चौकशी अहवालातील आकडेवारी पाहता खुलाशाचा फुगा केव्हाच फुटला आहे.
आता कर्मचारी भरती करताना वेगवेगळी कारणे दिली जातील, पण वस्तुस्थिती आणि गरज या तफावतीची तोंडमिळवणी करताना विद्यमान ट्रस्टींची तोतरी नक्कीच वळेल, अशीच चौकशी अहवालातील आकडेवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचल्याचे अख्ख्या महाराष्ट्राने ऐकले.
यापूर्वीही देवस्थानबद्दल अनेक तक्रारी झाल्या. त्याची चौकशी झाली पण चौकशीत देवस्थानला क्लीन चीट मिळाली. आता हे क्लीन चीट देणारे अधिकारी महाशयामागेही चौकशीची साडेसाती लागणार आहे. इतकी सगळी अनागोंदी असताना ती क्लीन चीट देणार्या त्या अधिकार्याला दिसली कशी नाही? असा प्रश्न आहे. त्या अधिकार्यांवर त्या वेळी दबाव होता का? असेल तर कोणाचा?, नसेल तर कोणी कोणाचे उखळ पांढरे केले का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.
बनावट अॅपचे प्रकरण बाहेर आल्यानंतर देवस्थानच्या अनागोंदीला वाचा फुटली. तोपर्यंत सर्व काही आलबेल असल्याचे वरवरचे चित्र रंगवले जात होते. हे बनावट अॅप देवस्थानच्या कर्मचार्यांचेच असल्याची चर्चा आहे. सायबर पोलिसांना मात्र अजून ते सापडलेले नाहीत. पूजा विधीच्या ऑनलाईन देणग्या या देवस्थानच्या खात्यावर जाण्याऐवजी या बनावट अॅपच्या माध्यमातून वैयक्तिक खासगी अकौंटमध्ये जात होत्या.
भ्रष्टाचाराच्या या तेलात कोणाकोणाचे हात माखले, ते शनिदेवच जाणोत. देवाकडे न्याय आहे. तो योग्यवेळी योग्य ती शिक्षा देतोच, पण ती करताना उगारलेल्या काठीचा आवाज मात्र येत नाही, अस म्हटलं जातं. आता कोणाकोणावर शनीचा प्रकोप होतोय, हे पाहावे लागेल.