

एकरूखे (जि. अहिल्यानगर) : बायको नांदायला येत नसल्याने चार मुलांना विहिरीत ढकलून पित्यानेही विहिरीत उडी मारत जीवनयात्रा संपविली. शिर्डीनजीकच्या कोर्हाळे शिवारात हृदय पिळवटून टकणारी ही घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. अरुण सुनील काळे (वय 35) असे मृत पित्याचे नाव असून मुलगी शिवानी अरुण काळे (वय 8), प्रेम अरुण काळे (वय 7), वीर अरुण काळे (वय 6), कबीर अरुण काळे (वय 4) अशी मृत मुलांची नावे आहेत. (Latest Ahilyanagar News)
काळे हे मुळचे श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगावचे रहिवासी आहेत. आठ दिवसांपूर्वी पत्नी माहेरी निघून गेली होती. ती नांदयाला येत नसल्याने नैरश्यातून अरूण काळे यांनी टोकाचे पाऊल उचलले. तीन मुले व एक मुलगी यांना विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर हातपाय बांधून त्याने स्वत:ला विहिरीत लोटले.
भाऊसाहेब धोंडीबा कोळगे यांच्या विहिरीत पाण्यावर तरंगणारे मृतदेह मेंढपाळाने पाहिले. त्यानंतर ही माहिती गावात कळाली. घटनेची माहिती कळताच पोलिस प्रशासनाने केलवड येथे धाव घेतली. दुपारी चार वाजेपर्यंत वडिल अरूण, मुलगी शिवानीसह एक मुलगा असे तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. पावसाची संततधार सुरू असल्याने मृतदेह शोध कार्यात अडथळे येत होते. पाण्यात गळ टाकत रेस्क्यू ऑपरेशन राबविल्यानंतर रात्री आठ वाजता दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश मिळाले. पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याने शुक्रवारी रात्रीच ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
मृत मुले बहिरवाडी, मेहेकरी येथील वीरभद्र प्राथमिक आश्रमशाळेत शिकत होती. शनिवारी अरुण काळे शाळेत गेला. मुलांची कटिंग करायची असल्याचे सांगत तो मुलांना सोबत घेऊन आला. तेथून तो मुलांना घेवून थेट केलवड ते कोर्हाळे बायपास रोडजवळील विहिरीवर पोहचला. तेथे त्याने हे भयानक कृत्य केले.