

कुपवाड : तानंग (ता. मिरज) येथील स्वागत को-ऑप. हौसिंग सोसायटीमधील प्लॉट, फ्लॅट देतो म्हणून येळावी (ता. तासगाव) येथील पती व पत्नी या दोघांनी पाचजणांची 58 लाख, 15 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार संस्थेचे सचिव गणपती पाखरे (रा. अलकुड (एस, ता. कवठेमहांकाळ) यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. धनाजी पाटील व पूनम धनाजी पाटील (दोघेही रा. येळावी, ता. तासगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : तानंग (ता. मिरज) येथील स्वागत हौसिंग सोसायटीचे सचिव माजी सैनिक गणपती तायाप्पा पाखरे (वय 58, रा. अलकुड (एस, ता. कवठेमहांकाळ) यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सौ. संगीता विजय टोपकर यांची 10 लाख, 50 हजारांची, सौ. शैलेश्री अरविंद बिले 10 लाख, संपतराव आप्पासाहेब चव्हाण 12 लाख 15 हजार, श्रीकांत आप्पासाहेब कोळेकर 12 लाख 50 हजार, सोनाली दिलीप जाधव यांची 13 लाख रुपये, या पाच जणांना स्वागत को-ऑप. हौसिंग सोसायटीमधील प्लॉट, फ्लॅट देतो म्हणून संशयित धनाजी पाटील व पत्नी पूनम धनाजी पाटील या दोघांनी पाच जणांची एकूण 58 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कुपवाड पोलिस ठाण्यात दिली आहे.