

राहुरी: शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडलेला असताना सत्ताधारी महायुतीतील शिवसेनेतील शेतकरीसेनेनेच आता राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नगर-मनमाड महामार्गावर मंगळवारी (दि.9) चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत कर्जमाफीच्या निकषांवर सडकून टीका करण्यात आली. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनच सरकारला ‘घरचा आहेर’ मिळाल्याची चर्चा रंगली आहे. राहुरी बाजार समिती परिसरात झालेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरसकट कर्जमाफीची मागणी लावून धरली. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात कर्जमाफीसाठी इतके किचकट निकष लादले आहेत की, लाभार्थी शेतकरी शोधूनही सापडणार नाहीत, असा आरोप मोरे यांनी केला.
कर्जमाफीचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात बहुतांश शेतकरी योजनेबाहेर फेकले जात असल्याने ग्रामीण भागात प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे ते म्हणाले. उद्योगपतींच्या हजारो कोटी रुपयांच्या कर्जांवर पांघरूण घातले जाते; मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र अटी-शर्तींचा डोंगर उभा केला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. १५ जूनपर्यंत कर्जमाफीचे निकष शिथिल करून सरसकट कर्जमाफी जाहीर केली नाही, तर मुंबईतील वर्षा बंगल्यावर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
आंदोलनात प्रकाश देठे, बाळासाहेब जाधव, संतोष चोळके, किरण कडू,सुनील आढाव, विजय तोडमल, गोरक्षनाथ लांबे, किशोर गाडे, सचिन म्हसे, किशोर वराळे, योगेश सोनवणे, संदीप खाडे, गजानन चव्हाण, सचिन पवार आदी उपस्थित होते.