

नगर: श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, निर्विघ्नपणे व कायदा-सुव्यवस्थेच्या वातावरणात पार पडावी यासाठी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी जिल्ह्यातून रेकॉर्डवरील ६२३ सराईत गुन्हेगारांना विसर्जन मिरवणूक होईपर्यंत हद्दपार करण्यात आले आहे.
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यातील सराईत, उपद्रवी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची यादी तयार करण्यात आली होती.
संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाण्यांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची कसून छाननी केल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक व उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान विसर्जन मिरवणुकीसाठी कोतवाली, तोफखाना, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा, शेवगाव, संगमनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणी चोख बंदोबस्त नेमण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ६२३ सराईत गुन्हेगारांना जिल्हा तसेच लगतच्या सीमांमधून ठराविक मुदतीसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
या व्यक्तींनी आदेशाचा भंग करून जिल्ह्यात प्रवेश केल्यास त्यांच्यावर तत्काळ अटकेची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. हद्दपारीसोबतच अनेक सराइतांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र (बॉण्ड) लिहून घेण्यात आले आहेत. त्यांनी काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीत संवेदनशील भागांमध्ये विशेष पोलिस तुकड्या आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.